⚡मालवण ता.०५-:
भंडारी समाज महासंघ, सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्स आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील मुलांना नृत्यकलेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल, मर्डे येथे दि. २८ ते २९ एप्रिल दरम्यान मोफत नृत्यकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक श्री सौरभ कांबळी व त्यांची टीम उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक मुला-मुलींना नृत्याचे प्रशिक्षण दिले असून त्यांनी परदेशातही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच भारतात आणि परदेशात नृत्यकलेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या प्रसंगी प्रसिद्ध नृत्यांगना व नृत्य कोरिओग्राफर तसेच भंडारी समाज महासंघाच्या ऋतुजा कांबळी , मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, मुंबई कमिटीचे सचिव प्रसाद बागवे, लोकल कमिटीचे अध्यक्ष राजन परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेचे उद्घाटन दि. 28 एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून कार्यशाळा सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत दोन दिवस चालणार आहे.
जिल्ह्यातील नवोदित नृत्य कलाकार, व्यावसायिक नृत्य कलाकार तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या मोफत नृत्य कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारी समाज महासंघ आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी दत्तप्रसाद पेडणेकर (मसुरे – पत्रकार)
मो. 9421145827 येथे संपर्क साधावा.
