कलमठमध्ये अपुरा व दूषित पाणीपुरवठा…

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांची पाणीपट्टी कपातीची मागणी..

⚡कणकवली ता.०५-: कलमठ गावात मागील काही वर्षांपासून जानेवारी महिन्यानंतर ग्रामपंचायतीकडून नियमित व मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी ग्रामपंचायत कलमठचे सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी अर्ज सादर करत ग्रामस्थांच्या पाणीपट्टीत कपात करण्याची मागणी केली आहे.

सदर अर्जात नमूद केल्याप्रमाणे, पाणीपुरवठ्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही नळयोजनेद्वारे स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची स्थिती कायम आहे. परिणामी ग्रामस्थांना कणकवली नगरपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र ते पाणीही पुरेशा प्रमाणात व निश्चित वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा धोका वाढत असून अपुऱ्या पाण्यामुळे दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे किंवा कामगार ठेवून पाणी आणावे लागत असल्याने आर्थिक भारही वाढत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, ज्या जलस्त्रोतावरून गावाला पाणीपुरवठा केला जातो तो स्त्रोत मुबलक असून तो दूषित होऊ नये यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, जानेवारीनंतर अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या पाणीपट्टीत योग्य ती कपात करण्यात यावी, अशी मागणीही धीरज मेस्त्री यांनी केली आहे.

You cannot copy content of this page