अपुऱ्या नुकसानभरपाईवर बाळ माने यांचा संताप..
⚡देवगड ता.०४-:
सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे आंबा, काजू फलोत्पादन जिल्हे म्हणून नावारुपास आलेले असताना येथील बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे. कोकणातील शेतकऱ्याला नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २२ हजार रूपयांची आर्थिक मदत शासनाने जाहीर करून कोकणातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी येथील शेतकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला आपला पूर्ण पाठींबा आहे. कोकणातील शेतकऱ्यांमध्ये बैठकांच्या माध्यमातून जनजागृती करून ‘चलो मुंबईचा’ नारा देण्यात येत असून या हा लढा अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे माजी आमदार बाळ माने यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बाळ माने यांनी बागायतदारांच्या लढ्याचे अभिनंदन करीत राज्य शासनाच्या धोरणावर टीकास्त्र डागले. यावेळी ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, श्री. सावंत आदी उपस्थित होते. श्री. माने म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी यांनी एकत्रित येऊन शेतकरी आंदोलने संघटितरित्या यशस्वी केली. कोकणातील पारंपरिक व यांत्रिक मच्छिमारही वाढत्या डिझेल दरवाढ व अन्य समस्यांमुळे आर्थिक अडचणीत आला असून त्यालाही योग्य आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठीही जनजागृती करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघरपर्यंत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. हापूस हा ब्रँड असला तरी ग्लोबल वॉर्मिंग, कीटकनाशकांचे दर, वातावरणातील बदल यामुळे आंबा बागायतदार अडचणीत आला आहे. या व्यथा मांडण्यासाठी शेतकरी संघटित होऊन लढला. परंतु त्याची दिशाभूल करण्यात आली. बागायतदार या नात्याने आपण संपूर्ण कोकण पट्टयात आलो असून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लढा दिला. शेतकऱ्यांना हमीभाव व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी मेळावे, मोर्चा, रास्ता रोको यासारखे आंदोलने करून येथील शेतकऱ्यांनी आंदोलने यशस्वी केली. नुकतीच दलाल, व्यापारी यांच्याशी चर्चा करून आंब्याला योग्य भाव देण्याबात सूचना करण्यात आली आहे. यापुढील काळात पुणे येथे कीटकनाशक औषध निर्मात्या कंपन्यासोबत तसेच पुणे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोबतही बैठका घेण्यात येणार असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने कोकणातील आंबा कलमाला २२० रूपये एवढीच नुकसानभरपाई देऊन बागायतदारांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला निव्वळ पाने पुसण्याचे काम शासनाने केले असून विदर्भ, मराठवाडा, तिसरी मुंबई, शक्तिपीठ मार्ग याकडेच शासनाने लक्ष आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना जोपर्यंत हापूस आंबा कलमांना प्रत्येकी ५ हजार रुपये आणि काजू कलमांना ३ हजार रूपये याप्रमाणे नुकसानभरपाई मिळणार नाही, तोपर्यंत बागायतदार शेतकऱ्यांच्या लढा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. हा लढा अधिक तीव्र होत असताना आंबा बागायतदारांच्यावतीने ‘चलो मुंबई’चा नारा देण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील अन्य भागातील आंबा, काजू बागायतदारांना संघटित करून आपल्या न्याय मागण्यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल. या लढ्यात शेतकऱ्यांच्या पूर्णतः पाठीशी संघटना उभी राहणार आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात रत्नागिरीबरोबरच देवगडमध्ये देखील एक मोठा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येईल, असेही बाळ माने यांनी सांगितले.
सुशांत नाईक म्हणाले, कोकणातील शेतकऱ्याला रस्त्यावर उतरू देणार नाही. राज्य सरकारकडून भरीव मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले होते. असे असताना पालकमंत्र्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटीची तुटपुंजी मदत मुख्यमंत्र्यांना का जाहीर करायला दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चौकट घेणे
कोकणातील बागायतदारांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या देवगडातील आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार बाळ माने यांनी अभिनंदन केले. यावर्षीच्या हंगामात कोकणातील आंबा बागायतदार विविध समस्यांना सामोरे जात असताना हवालदील झाला होता. परंतु त्याचा आवाज, त्याची व्यथा शासन दरबारी पोहोचविण्यासाठीचा लढा देवगडमधून सुरू झाला. ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगत बाळ माने यांनी बागायतदारांच्या या लढ्याला पूर्ण पाठींबा असल्याचे सांगितले.
फोटो कॅप्शन
- देवगड येथील पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार बाळ माने. बाजूला सुशांत नाईक.
- बागायतदारांच्या न्यायासाठी एकजुटीने लढा निर्माण करणाऱ्या येथील बागायतदार संघटनेचे अभिनंदन करताना माजी आमदार बाळ माने.
