बांदा-दाणोली मार्गाला बायपास करा…

निमजगा ग्रामस्थांची मागणी:तीव्र उतार, दाट लोकवस्ती व शाळेमुळे अपघातांचा धोका…

⚡बांदा ता.२६-: बांदा-दाणोली या राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून सदर मार्गावरील मुंबई-गोवा महामार्ग ते निमजगा पीडब्ल्यूडी मैदान दरम्यानचा अंदाजे एक किलोमीटरचा रस्ता हा तीव्र उताराचा असून दाट लोकवस्तीचा आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची मोठी पटसंख्या असलेली शाळा देखील असल्याने सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात अनेक व्यत्यय येत आहेत. त्यामुळे बांदा-दाणोली मार्गाला बायपास करण्याची मागणी स्थानिक निमजगा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत सविस्तर मागणीचे लेखी निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्ता हा राज्यमार्ग होणार असल्याने सदर मार्गावर असलेला तीव्र उतार पाहता राज्यमार्गाच्या निकषांच्या दृष्टीने हा रस्ता परिपूर्ण ठरत नाही. तसेच इथे असलेली शाळा, दाट लोकवस्ती यामुळे भविष्यात होणारे अपघात व इतर बाबींचा विचार करून सदर रस्त्याला अगोदरच बायपास करून मुंबई-गोवा महामार्गाला रस्ता जोडण्यात यावा. जेणेकरून येथील रस्त्याच्या दृष्टीने अयोग्य असलेली भौगोलिक परिस्थिती व इतर बाबींचा विचार करता भविष्यकाळात उद्भवणाऱ्या अडचणी टाळता येतील. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर याच पट्ट्यातील अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या दहा व बारा चाकी खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरच्या विरोधात देखील येथील ग्रामस्थांनी नेहमीच आक्रमक भूमिका दाखवली आहे. तरी या रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करून सदर रस्त्याला बायपास करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी माजी बांदा सरपंच स्वप्नाली पवार, दीपक नाईक, भुषण सावंत, केशव नाईक, समिर मयेकर, संदेश नाईक, गुरुप्रसाद गडेकर, रेणूका सुभेदार, पुजा नाईक, गायत्री गडेकर, मिताली सावंत-मोर्ये यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:-
सावंतवाडी येथे अधिकाऱ्यांना निवेदन देताना निमजगा ग्रामस्थ.

You cannot copy content of this page