रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती:मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश..
⚡दिल्ली दि.२५-: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी या १०८ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अखेर तयार झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे या रेल्वे प्रकल्पासाठी माजी केंद्रीयमंत्री खा.नारायण राणे,सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा अव्याहत पाठपुरावा सुरु आहे.
हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकणातील मालवाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट आणि कमी वेळेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सामाजिक आणि आर्थिक निकषांवर आधारित या प्रकल्पाला गती देण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
डीपीआर तयार झाल्यानंतर या प्रकल्पासाठी राज्य सरकारांसह विविध भागधारकांकडून सल्ला आवश्यक असून, सोबतच नीती आयोगाकडून आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय इत्यादीकडून मूल्यांकनासारख्या आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतील.प्रकल्प मंजुरी ही सतत चालणारी आणि विविधांगी प्रक्रिया असल्यामुळे, विविध भागधारकांकडून होणारी मूल्यांकने आणि परवानग्या यावर प्रकल्प पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा अवलंबून असेल.
सद्यस्थितीला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस [एससीएसएम(टी)] कोल्हापूर या स्थानकाला ३० रेल्वेगाड्यांची सेवा पुरवली जात असून त्यांच्या मदतीने कोल्हापूरला मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या प्रमुख ठिकाणांशी जोडण्यात आले आहे.
हा रेल्वे मार्ग १०८ किमी लांबीचा असून यामुळे कोल्हापूर आणि कोकण रेल्वे मार्ग थेट जोडला जाणार आहे.डीपीआर तयार झाला असला तरी, आता या प्रकल्पासाठी नीती आयोग आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मूल्यमापन व अंतिम मंजुरीची आवश्यकता आहे.प्रकल्पाची गती ही जमीन अधिग्रहण, वनखात्याची मंजुरी, अतिक्रमणे हटवणे आणि निधीची उपलब्धता या तांत्रिक बाबींवर अवलंबून आहे असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.यासर्व तांत्रिक बाबींवर वेगाने काम सुरु असल्याचेही लोकसभेत रेल्वेमंत्र्यांनी सांगीतले.
