गाबीत समाज वस्त्या सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया वस्तुस्थितीदर्शक राबविण्यात यावी…

गाबीत फिशरमेन फेडरेशनतर्फे मागणी..

⚡मालवण ता.२५:-
गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया स्थानिक गाबीत समाजास सोबत घेऊन वस्तुस्थिती दर्शक राबविण्यात यावी, यासाठी गाबीत वस्तीत घरोघरी सर्व्हे करण्यात यावे, अशी मागणी गाबीत फिशरमन फेडरेशनच्या वतीने मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी गाबीत फिशरमेन फेडरेशनचे अध्यक्ष बाबा मोंडकर, सुरेश बापर्डेकर, छोटू सावजी, बाबी जोगी, विकी चोपडेकर, रश्मीन रेगे, अन्वय प्रभू, हेमंत मोडकर, दाजीबा कुबल, आदी उपस्थित होते.

राज्य सरकार तर्फे होणाऱ्या गाबीत समाज सर्वेक्षण व सीमाकंन प्रक्रिया प्रशासनाने स्थानिक गाबीत समाजास बरोबर घेऊन समन्वय्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षरित्या या विषयी स्थानिक प्रशासन उदासीन आहे. राज्य सरकारने कोळी समाजाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमाकन करण्यासाठी आदेश दिले आहेत कोळी समाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्या नंतर दि. १३ मार्च रोजी विभागीय आयुक्त कोकण यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स ‌द्वारे जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्‌ह्यातील गाबीत समाजातील गाव व वाडीनिहाय लोकसंख्या गाबीत समाजाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व सीमाकंन करण्याच्या सूचना दिल्या असून त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मालवण, देवगड वेंगुर्ला तालुक्यातील तहसीलदार यांना पत्रा‌द्वारे सूचना दिल्या आहेत प्रत्यक्ष मात्र स्थानिक तहसीलदार यांच्या कडून गाबीत समाजास अपेक्षित असलेले सर्वेक्षण होताना दिसत नसून सदर सर्वेक्षण सीमाकंन गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे यावेळी उपस्थित गाबीत समाजातील प्रतिनिधिनी सांगितले.

गाबीत समाजाच्या भविष्यातील सामाजिक आर्थिक स्थिरतेसाठी हे सीमाकंन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे मालवण खाडी, किनारप‌ट्टीवर वसलेल्या शहर व ग्रामीण गाबीत समाजाच्या कुटुंबांसाठी हे सर्वेक्षण महत्वाचे आहे. आज ज्या किनारपट्टीला बांधकाम काढायच्या नोटीस येत आहेत तिथे सीमाकंन, सर्वेक्षण झाले असते तर ही वेळ आली नसती. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गाबीत समाजाची लोकसंख्या, समाजाच्या माध्यमातून पारंपारिक मच्छिमारी साठी वापरात असलेल्या समुद्र, नदी, खाडी किनाऱ्याच्या जागा, समुद्र किनारी रापण, लाकडी होड्या मासे खारवणे, सुकविणे तसेच नौका ठेवण्यासाठी, मासे खरेदी विक्री साठी तात्पुरत्या स्वरूपात शेरी (सरकारी जागेत) कावणे तसेच अनेक वर्ष अश्याच जागेत बेघर गाबीत समाजाची घरे यांचे सर्वेक्षण, सीमाकंन होऊन गाबीत (कोळी) वाडे जाहीर होणे गरजेचे आहे. सीमाकंन व सर्वेक्षण साठी मुंबई मध्ये नियोजन पद्धतीने काम सुरु केले आहे या उलट गाबीत मालवण तालुक्यातील गाबीत समाजाच्या वाडीवस्त्या मध्ये या सर्वेक्षणा विषयी माहिती नाही असे वातावरण किनारपट्टी भागात आहे. गाबीत समाजासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थेच्या तसेच समाजातील विविध राजकीय पक्षाशी जोडलेले लोकप्रतिनिधी, समाजासाठी कार्य करत असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन ग्राम स्तरावर गाबीत समाजाच्या वाडी वस्ती सीमाकंन, सर्वेक्षण करण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा उभारून शहर व ग्रामीण स्तरावर त्वरित सर्वेक्षण करावे. गाबीत समाज लोकसंख्या गणनेसाठी गाबीत वस्तीमध्ये घरोघरी भेटी देऊन नोंदी घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत प्रशासन स्तरावर दुर्लक्ष होऊन गाबीत समाजाचा स्वतःच्या न्याय हक्कासाठी उद्रेक झाल्यास त्यास स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असेही यावेळी गाबीत प्रतिनिधीनी सांगितले.

दरम्यान, या मागणीला तहसीलदार गणेश लव्हे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याविषयी आपण सर्व माहिती घेत असून याबाबत सोमवारी ३० मार्च रोजी तहसील प्रशासन, मेरिटाइम बोर्ड अधिकारी व गाबीत समाज प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल असे सांगितले.

You cannot copy content of this page