चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन – विजय चौकेकर…

⚡देवगड ता.२५-:
समाजात खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या प्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजाचे स्वास्थ्य अबाधित राहावे आणि भोंदूगिरीपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. हा कायदा समजून घेऊन, चमत्कार आणि अकल्पित घटनांमागील सत्य जाणून घेतल्यास प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होऊ शकतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले.
जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रसार व प्रचारासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC) सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक जोशी विद्यामंदिर, जामसंडे नं. १ येथे विद्यार्थ्यांसह पालकांसाठी मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांसह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे, जगदीश गोगटे, पूनम पवार, अनघा येरागी, मुख्याध्यापिका सुमेधा तेली, सुदाम जोशी, राजश्री मोंडकर, सूधा घाडी, दिनेश दळवी, रघुनाथ बोडेकर, सचिन बेर्डे, पृथा बेर्डे, निकीता परब यांसह शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.
यावेळी अजित कांबळे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, जादूटोणा विरोधी कायदा हा देव-धर्माविरोधी नसून देवधर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरोधात आहे. हा कायदा प्रत्येकाने समजून घेत घराघरात जनजागृती करावी, लहानांपासून थोरांपर्यंत याची माहिती पोहोचवावी आणि कोणत्याही भोंदू बाबांच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
विजय चौकेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात जादूटोणा करणारे भोंदू लोक अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून कशाप्रकारे लोकांची फसवणूक करतात, हे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उलगडून दाखविले. पाण्याने दिवा पेटविणे, मंत्राने अग्नी पेटविणे, गड्ड्यात भूत उतरविणे, नारळातून करणी काढणे, मंत्राने अगरबत्तीची दिशा बदलणे, हातातून सोन्याची चैन काढणे, जिभेतून तार आरपार काढणे, पेटता कापूर खाणे अशा अनेक तथाकथित ‘चमत्कारां’मागील हातचलाखी त्यांनी प्रत्यक्ष सादर केली.
तसेच, गावात कोणी अशाप्रकारे भोंदूगिरी करत असल्यास त्याची तक्रार तात्काळ नजिकच्या पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजात जादूटोण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

You cannot copy content of this page