सुरेश भोगटे यांचा आरोप:ठेकेदार प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा ही केला आरोप..
⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील माठेवाडा ते वैश्यवाडा, गवळी तिठा परिसरात सुरू असलेल्या पाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून संबंधित ठेकेदाराकडून बोगस पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आज येथे केला
ते म्हणाले, या कामासाठी रस्ते खोदून पाईप टाकण्यात आले आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि धूळ साचल्याने परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरामध्ये धूळ शिरत असून वाहनांवरही मातीचे थर साचत आहेत. यापूर्वी अशा प्रकारे अस्वच्छ आणि नियोजनशून्य काम कधी झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दिवसाढवळ्या जेसीबीच्या साहाय्याने रस्ते उकरून काम केले जात असून ठेकेदाराची माणसे कोणाच्याही सूचना ऐकत नसल्याचा आरोप आहे. कामाच्या ठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारीही अनुपस्थित असल्याचे नागरिकांनी सांगितले. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स तुटल्याने अनेक नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे.तसेच, टाकण्यात येणाऱ्या पाईपची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत हे पाईप ब्रँडेड नसून भविष्यात लिकेज होण्याची शक्यता असल्याची भीती भोगटे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा खर्च करून पाईप बदलण्याची वेळ येईल, अशी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता संबंधित ठेकेदाराला लेखी सूचना देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ठेकेदार प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या कामामागे कोणाचे पाठबळ आहे का, याबाबत शहरात चर्चा रंगत आहे.
सदर काम कोणत्या निकषांनुसार सुरू आहे, याबाबत नगरपालिकेने नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी तसेच कामाची गुणवत्ता सुधारून योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
