सावंतवाडी नगरपरिषद ठेकेदारांची दुकान चालवतात…

तौकीर शेख यांचा गंभीर आरोप:तर गॅस पाईपलाईन कामावरून संजू परब आक्रमक, दोषींवर कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी नगरपरिषदेत ठेकेदारीची दुकान चालवत असल्याचा गंभीर आरोप कॉग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केला. ठेकेदारांच्या संभाषणाचा पुरावा देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी गॅस पाईपलाईनच्या कामावरून अधिकाऱ्यांना झापल. यावेळी प्र. नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी शेख यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना माहिती घेऊन खुलासा करू, दोषी असल्यास कारवाई करू अशी ग्वाही दिली.

सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा लोकमान्य टिळक सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी २४ ठरावांना मंजूरी देण्यात आली. काही मुद्यांवर विरोधी नगरसेवक आक्रमक झाल्याने सत्ताधारी व‌ विरोधकांत शाब्दिक चकमक उडाली. प्र. नगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी कुशलतेने सभा हाताळली. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, विणा जाधव, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, निलम नाईक, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विरोधी शिवसेना नगरसेवक संजू परब, बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी, ॲड. निता सावंत-कविटकर, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, कॉग्रेसचे तौकिर शेख, उबाठा शिवसेनेचे देवा टेमकर आदी उपस्थित होते.

सभेच्य सुरूवातीलाच संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुख्याधिकारी नेमके गेले कुठे ? असा थेट सवाल करत, त्यांनी प्रशासकीय नियमांवरून सभेला जोरदार विरोध दर्शवला. यावेळी भाजप-शिवसेनेत जुंपलेली पहायाल मिळाले. सभापती सुधीर आडीवरेकर व भाजप नगरसेवकांनी सभा तातडीने सुरू करण्यासाठी जोर लावला होता. सचिव उपस्थित नसले तरी अध्यक्ष असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, संजू परब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मुख्याधिकारी नसल्याने सभेचे कामकाज नियमानुसार चालणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मुख्याधिकारी रजेवर असतील तर पदभार कोणाकडे? आहे असा सवाल करत श्री. परब यांनी प्रशासनाला जाब विचारला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांना नियमांनुसार कार्यवाही करण्याच्या आणि आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्याधिकारी रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कॉग्रेस नगरसेवक तौकीर शेख यांनी ठेकेदारीच्या मुद्यावर सभागृहाच लक्ष वेधल. नगरपरिषदेच्या टेंडरबाबत ठेकेदारांचा गृप असून बंड्या कुलकर्णी, हमीद, महेंद्र सांगेलकर, महेश पांचाळ अशी नावं गृपवर टाकलेली असून गौरव जाधव यांनी विलास जाधव यांना विचारूनच समाजमंदिर येथील टेंडर भराव, ते काम मी करणार आहे असा मेसेज केल्याचे पुरावे सादर केले. तर हे विलास जाधव कोण ? असाही सवाल केला. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर यांनी विस्तृत माहिती घेऊन दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, माहिती घेऊन याबाबत खुलासा केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी यात नगरपरिषदेची बदनामी होत असून यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली. यावेळी श्री.‌ शेख यांनी प्रशासकीय कार्यकाळात मुलगी शिकत असताना तिच्या नावावर ठेका घेतल्याचा आरोप दादा गवंडी यांच्यावर केला. तर सुशांत बांदेकर व दिनेश मुदगुल हे दोन ठेकेदार सामग्री नसताना कोटींची टेंडर घेऊन काम वाटत आपल दुकान चालवत असल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला.

तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या रजेच्या अर्जाच्या मुद्यावर आक्षेप घेत ॲड. निता सावंत-कविटकर यांनी हा मुद्दा मागच्या सभेत का घेतला गेला नाही ? तसेच २० जानेवारीला अर्ज येण्याआधी पदभार उपनगराध्यक्षांना दिलेला का ? असा सवाल केला. यावर ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून अर्ज सादर केल्याचे सांगितले. तर, नगरसेवक अजय गोंदावळे यांनी नळपाणी व गॅस पाईपलाईन कामावेळी ठेकेदारांकडून माती गटारात टाकल्याचे निदर्शनास आणून देत तात्काळ सफाईची मागणी केली. यावेळी नगरसेविका निलम नाईक यांनी कामाला सुरुवात झाल्याचे सांगितले. तर नगरसेवक देवा टेमकर यांनी ठेकेदाराकडूनच बुजलेले व्यवस्थित करून‌ घेण्याची मागणी केली. आयत्यावेळीच्या विषयात सभापती दिपाली भालेकर यांनी पाणपोई विषय, नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी स्मशानभूमीजवळील दफनभुमी, पाणपोई व गवा रेड्यांचा उपद्रव, ॲड. सायली दुभाषी यांनी पाणी टंचाई, देव्या सुर्याजी यांनी सीसीटीव्ही, नळपाणी योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावे आदी मुद्दे मांडले. बाबू कुडतरकर यांनी ठेकेदारांच्या मुद्यावर अंदाजपत्रकातच तरतूद केली जावी असा विषय मांडला. न.प. आस्थापनेवरील लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार म्हणून नेमणूक करण्याचा ठराव मंजूर केल्याबद्दल ॲड. निरवडेकर यांनी सभागृहाचे अभिनंदन केले.

दरम्यान, नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी शिव उद्यानमधील घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. चिमुकल्या मुलीला नादुरुस्त झालेल्या खेळण्यांमुळे इजा झाली असून लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. लाखोंचा निधीची तरतूद करूनही ही परिस्थिती का ? असा त्यांनी केला. यावेळी उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी मोठी इजा झालेली नसून किरकोळ लागल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती मुलांसह रात्रीच्या वेळी उद्यान बंद होण्याच्या दरम्यान तिथे गेल्याचे सांगत चुकीची माहिती प्रसिद्धी माध्यमांनी दिल्याचे म्हटले.‌ यावेळी प्र. नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केला. तसेच संजू परब यांनी गॅस पाईपलाईनच्या कामावरून अधिकाऱ्यांना झापल. चुकीच्या पद्धतीने काम सुरू असून अधिकाऱ्यांच लक्ष नसल्याचे त्यांनी नमूद केले. काही मुद्यांवरून सभागृहात शाब्दिक चकमक उडाली तसेच श्री. परब आणि प्र. नगराध्यक्षांनी एकमेकांना कोपरखळी मारण्याची संधी सोडली नाही.

You cannot copy content of this page