कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जहरी टिका
*💫देवगड दि.२३-:* आमदारांच्या नियुक्तीवरून राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर जहरी टीका केली आहे. मुंबईत राज्यपालांचं कार्यालय राहिलं नसून ते भाजप कार्यालय झालं आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. ‘मुंबईचं गव्हर्नर ऑफिस हे भाजपचं कार्यालय झालं आहे. हे होता कामा नये, कारण राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्याला सगळ्यांचे कान ओढण्याचा अधिकार असतो. पण जेव्हा १२ व्यक्तींच्या नावाचा ठराव करून कॅबिनेट त्यांच्या नावाची यादी पाठवते तेव्हा त्या त्या क्षेत्राला प्राधान्य मिळावे, त्या क्षेत्राला न्याय मिळावा ही त्यातली भूमिका असते. काही चुकलं असेल तर त्यांनी शासनाला कळवावे. जे नियमात बसत नसेल तर त्यात शासन बदल करू शकतं. पण ते दाबून ठेवणं आणि त्या क्षेत्रातील प्रतिनिधीला संपवणं ही भूमिका चुकीची आहे. म्हणून राज्यपाल महोदयाना विनंती आहे की या सर्व प्रकरणावर पडदा पाडावा आणि विधानपरिषदेसाठी पाठवण्यात आलेल्या १२ जणांच्या नावाला मान्यता द्यावी,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी आज देवगड , मालवण, वेंगुर्ला येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तेव्हा ते बोलत होते.
