कणकवलीत राजू शेट्टींचा इशारा.
कणकवली : आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सुशांत नाईक, संजय नरे, अप्पा चव्हाण, संजय गावडे, किरण तेंबुलकर, गणेश गावकर, तुकाराम ठाकूर, गणेश फाळके, रामचंद्र लुडबे आदी उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या वर्षभरात झालेल्या वातावरणातील मोठ्या बदलांचा फटका कोकणातील आंबा व काजू पिकांना बसला आहे. दहा मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात सतत बदल होत राहिले. दिवसा कडक ऊन तर रात्री कडाक्याची थंडी अशा स्थितीमुळे सुरुवातीला काजू पिक चांगले आले होते; मात्र नंतर वातावरण बिघडल्याने आंब्याचा मोहर जळून गेला. निकृष्ट दर्जाच्या फवारणी औषधांमुळेही नुकसान झाले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कोकण कृषी विद्यापीठाने यावर अधिक संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते; मात्र तसे झालेले दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. वेंगुर्ले ते दापोली परिसरातील विविध बागांची पाहणी केल्यानंतर हापूस आंब्याचे सुमारे ९०% टक्के उत्पादन घटले असून अवघे १०% टक्के पीक शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या सुमारास ३० ते ३५ हजार आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल होत असत; मात्र यंदा केवळ ८ ते १० हजार पेट्याच बाजारात आल्याचे त्यांनी नमूद केले. बाजारात येणारा आंबा खरोखर कोकणी आहे की कोकणी नावाखाली विक्री होत आहे, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. केसर आंब्याची परिस्थिती काहीशी समाधानकारक असली तरी काजू उत्पादनातही घट झाल्याने शेतकरी मोठ्या तोट्यात असल्याचे ते म्हणाले.
फवारणीसाठी घेतलेल्या औषधांच्या उधारीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जर व्यापारी किंवा विक्रेते शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर नफा कमावणाऱ्यांनी यंदा संयम बाळगावा,” असेही ते म्हणाले.
सरकारकडे मागणी करताना त्यांनी सांगितले की, आंबा पिकासाठी हेक्टरी ५ लाख रुपये किंवा प्रति कलम ५ हजार रुपये, तर काजूसाठी हेक्टरी३ लाख रुपये मदत जाहीर करावी. १२ मार्च रोजी काढलेल्या मोर्चावेळी पालकमंत्र्यांनी दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
२३ मार्चला नांदगाव येथे ठरल्याप्रमाणे आंदोलन होणारच. राष्ट्रीय महामार्ग अडवता येत नसला तरी सविनय कायदेभंग करून चक्काजाम करण्यात येईल, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही दिला. तसेच आंदोलनकर्त्यांना नोटिसा देऊन किंवा दबाव टाकून दडपशाही करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, विधानभवनातील बैठकीत अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित असतानाही प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा आवाज ऐकला गेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा कोऱ्या करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत, त्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
