*अखिल भारतीय मच्छिमार गाबीत समाज महासंघ सेक्रेटरी सुरेश बापर्डेकर यांचा मत्स्य विभागास इशारा*
*💫मालवण-:* क्यार व महा चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासनाने मंजूर केलेली आर्थिक मदत अद्यापही रापण संघ व मच्छी विक्रेत्या महिलांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाकडून आर्थिक मदतीबाबत अंमलबजावणीचे आदेश असताना मत्स्य विभागाकडून त्याची कार्यवाही का झाली नाही याचा खुलासा करावा. दि. २५ मे पर्यंत सर्व लाभार्थी मच्छीमारांना आर्थिक मदतीचे वाटप न झाल्यास दि. २७ मे पासून मालवणच्या सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाचे सेक्रेटरी सुरेश बापर्डेकर यांनी मत्स्य विभागाला दिला आहे. अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज या संस्थे तर्फे सेक्रेटरी सुरेश बापर्डेकर यांनी याबाबतचे निवेदन मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिले आहे. क्यार व महा चक्रीवादळा नंतर शासनाने मच्छीमारांना जाहीर केलेले आर्थिक पॅकेजची रक्कम अद्यापही अनेक मच्छीमारांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाने जाहीर केलेली मदत मत्स्य विभागाकडे उपलब्ध होऊनही रापण संघ व मत्स्य विक्रेत्या महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. याबाबत वेळोवेळी लक्ष वेधून तसेच अधिकाऱ्यांनी आश्वासने व लेखी मुदत संपूनही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. शासनाने दिलेल्या आर्थिक मदतीची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी असे आदेश असताना मत्स्य विभागाकडून कार्यवाही का झाली नाही याचा खुलासा करावा अशी मागणी सुरेश बापर्डेकर यांनी केली आहे. जुन्या वादळाचा मदत निधी अद्याप संपत नाही तोपर्यंत राज्याच्या किनारपट्टीवर दुसरे वादळ येऊन किनारपट्टीवरील नागरिकांचे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवालही बापर्डेकर यांनी केला आहे. २५ मे पर्यंत आर्थिक मदतीची रक्कम लाभार्थी मच्छीमारांच्या खात्यावर जमा न झाल्यास २७ मे रोजी पासून आमरण उपोषण छेडू असा इशारा सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे.
