⚡दोडामार्ग ता.०४-: तालुक्यातील तिलारी खोऱ्यात काजू हंगामात हत्तींच्या मुक्त संचारामुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी निर्णायक लढ्याचा इशारा दिला आहे. केर येथे ग्रामस्थ व वनविभागाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रथम लोकप्रतिनिधींना भेटून प्रश्न मांडण्याचा, ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी १३ सदस्यीय संघर्ष समिती स्थापन करण्याचे ठरले.
शेतकऱ्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन तिलारी खोऱ्यातील हत्ती प्रश्न जिल्हास्तरावर मांडण्याचे ठरविले आहे.
बैठकीत २०१८ पासून हत्तींच्या त्रासाबाबत पाठपुरावा सुरू असूनही ठोस उपाययोजना न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काजू हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असताना हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी मांडली.
या बैठकीस शिवसेना नेते राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई, गोपाळ गवस, तेजस देसाई, तुकाराम देसाई, रत्नकांत देसाई, हर्षद देसाई, विष्णू देसाई, शिवराम देसाई, सगुण नाईक, शंकर देसाई, मंगेश देसाई, राघोबा देसाई, नारायण देसाई, महेंद्र देसाई, प्रकाश देसाई, अनंत देसाई, पोलीस पाटील सर्वेश देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा हा एल्गार प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार असून, शासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिलारी खोऱ्यात हत्ती प्रश्नावर शेतकऱ्यांचा एल्गार…
