बलिदान मासानिमित्त शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेत शिवकालीन ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन…

शिवशंभू ग्रुप मळगावचा इतिहास जागवणारा प्रेरणादायी उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.०४:- मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून आताच्या पिढीस ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मळगाव येथील शारदा विद्यामंदिर, सावळवाडा शाळेत प्रथमच शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन व माहिती हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगणे आणि शिवकालीन वारशाची जाणीव करून देणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी ग्रुपच्यावतीने खजिनदार सुनील राऊळ, सचिव ज्ञानेश्वर राणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा मोरजकर, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, चंद्रकांत जाधव, शाळा व्यवस्थापन कमिटीच्यावतीने पांडुरंग बुगडे, निकीता बुगडे, हिक्षक, पालक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान व छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे कार्य पुढच्या पिढी पर्यत पोहोचविण्यासाठी श्री शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात. या प्रदर्शनात मराठा शस्त्रागारातील शस्त्र मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार ,बिचवा, वाघनखे, खंडा तरवार, नागीन तरवार, ढाल, जिरेटोप, तोफ प्रतिकृती तसेच ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. यावेळी ग्रुपचे ज्ञानेश्वर राणे व सुनील राऊळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवकार्याचे महत्त्व तसेच सध्याच्या काळात बलिदान मासाचे महत्त्व स्पष्ट केले. विविध दुर्गांची माहिती देत प्रात्यक्षिकांसह शिक्षणात्मक सत्र घेण्यात आले. यावेळी मुलांनी प्रत्यक्षरित्या शिवकालीन शस्त्रे हाताळून त्याची प्रचिती घेतली. लवकरच श्री शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने शिव संस्कार शिबिराचे नियोजन करून येणाऱ्या पुढील पिढीस गड कोट दुर्गाचे संवर्धन व त्याचे महत्त्व तसेच शिवकार्य करण्याची आवड निर्माण व्हावी, असा मानस ग्रुपचे अध्यक्ष सहदेव राऊळ, उपाध्यक्ष प्रथमेश राणे, सचिव ज्ञानेश्वर राणे, खजिनदार सुनील राऊळ यांनी स्पष्ट केला. मळगाव येथील इतरही शाळांनी सावळवाडा शाळेचा आदर्श घेऊन आपल्या शाळेत हा उपक्रम राबवावा, असे आवाहनही ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वागत व आभार मुख्याध्यापिका सीमा मोराजकर यांनी मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच शिवकालीन इतिहास माहिती व अनुभव मिळत असल्याने शिवशंभू ग्रुप राबवत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page