पहाटेची घटना: सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला..
⚡कुडाळ ता.०४-: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक वेताळबांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज दाट धुके पडले असून चालकाला रस्त्याचा अंदाज न असल्याने हा अपघात घडला असावा.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी (एम एच ४८ ए के ०५०८) ही मर्सिडीज कार वेताळबांबर्डे येथील अरुंद पुलावर आली असता येथील संरक्षक कठडे सोडून मार्गाच्या बाजूला असलेल्या १० फुट खड्ड्यात जाऊन आदळली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने कारमधील दोघांना बाहेर काढले.
वेताळबांबर्डे आणि पणदूर सीमेवरील पूल येथील गोव्याकडे जाणारी लेन ही अरुंद असल्याने या ठिकाणी आजवर भीषण अपघात घडले आहेत. येथील अरुंद लेनचे काम मागील ५ ते ६ वर्षे अपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
