विरोधी पक्षनेते फडणवीस यांची टिका
मालवण (प्रतिनिधी) गतवर्षीच्या निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांसाठी अनेक घोषणा झाल्या मात्र आपदग्रस्तांच्या हाती काही लागले नाही. कोकणवासीयांची शासनाकडून थट्टाच करण्यात आली. कोकणने शिवसेनेला आणि राज्यसरकारला नेहमी भरभरून दिले. मात्र शिवसेनेने कोकणाला संकटात तोंडाला पाने पूसण्याचेच काम केले, अशी टीका विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचरा येथे बोलताना केली तौत्के वादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर असलेले विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आचरा गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मालवण तहसीलदार अजय पाटणे, मालवण भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाबा परब, भाऊ सामंत, महेश मांजरेकर, जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या सह भाजप कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी ना. फडणवीस यांनी आचरा जामडूल बेटाकडे आलेल्या खाडीत गाळ भरून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर आचरा ग्रामपंचायत येथे आढावा बैठक घेऊन तहसीलदार अजय पाटणे व गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्याकडून फडणवीस यांनी नुकसानीची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा व्यावसायिक, मच्छीमार यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झाडांची मुळेही हलली असून ही झाडे पुढील दीड वर्षात कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे येथील फळ बागायतदार आणखी अडचणीत येणार आहेत. वादळाची सूचना चार दिवस अगोदर मिळाली असताना सुद्धा देवगड बंदरात वेळेवर उपाययोजना करण्यात आली नाही. आपतकाळासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली नाही. उपाययोजना केल्या असत्या तर आज तेथील मच्छीमारांना जीव गमवावा लागला नसता. मच्छीमारांचा आक्रोश झाला नसता. त्यामुळे नुकसानग्रस्त मच्छीमारांना भरघोस मदत मिळाली पाहिजे. गतवर्षीच्या निसर्ग वादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळाली नाही. डिझेल परतावा मिळाला नाही. आता तौक्ते वादळाने पुन्हा नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांची नौकांची कर्जे माफ झाली पाहिजेत. येथील आंबा व्यावसायिक, शेतकरी, मच्छीमार यांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. कोकणने शिवसेना व सरकारला भरभरून दिले आहे. त्यामुळे आता संकटात सरकारने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहावे हीच येथील जनतेची अपेक्षा आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्याने सक्रिय आहोत. कोकणच्या कानाकोपऱ्यात फिरत आहोत. तीन दिवसांच्या पाहणी दौऱ्यात आपण कोकणातील अडचणी जाणून घेतल्या आहेत. या अडचणींबाबत सरकारकडे पाठपुरावा करून तसेच सरकारला व यंत्रणेला जागे करून कोकणच्या पदरात आर्थिक मदत पाडून घेण्याचे प्रयत्न आपण करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. वादळादरम्यान आचरा खाडी गाळाने भरल्यामुळे अर्ध्या गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. गाळामुळे नुकसान झालेल्या घरांना मदत मिळाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
