डिजिटल शिक्षणातून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दिशा.
⚡कणकवली ता.२८-: जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने चौके गावातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘प्रज्ञानी’ हा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निश्चितच होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ तथा ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे प्रणेते प्रवीण शेवडे यांनी व्यक्त केला.
इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रभावी प्रशिक्षण मिळावे, यासाठी कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे प. पू. भालचंद्र महाराज जि. प. शाळा क्रमांक ३ येथे ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शुभारंभ प्रवीण शेवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेकर, राजा राजाध्यक्ष, मुख्याध्यापिका अक्षया राणे, शिक्षिका नेहा सामंत, राजेंद्र परब, प्रतिभा कोरगावकर, संतोष घाडीगावकर, ज्योत्स्ना चव्हाण, संजय तांबे, शर्मिला चव्हाण, अर्चना राऊत, अश्विनी साटम, रूपाली डोईफोडे, सुरेखा सावंत यांसह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण शेवडे म्हणाले, डिजिटल विश्वातील नवसंकल्पनांशी विद्यार्थ्यांना जोडण्याचा आमचा मानस आहे. व्हर्च्युअल क्लासरूम ही पुढील पायरी असली तरी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी पुणे व मुंबईतील शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑनसाईट या द्विसंगम पद्धतीने देण्याचा ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
किशोर गवस यांनी ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, आजचे युग स्पर्धेचे आहे. शासनाच्या शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. व्यापारी संघाने घेतलेला हा पुढाकार स्तुत्य असून प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार.”
संजय मोरे यांनी ‘प्रज्ञानी’ उपक्रमाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन केले. प्रारंभी दीपक बेलवलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन शिक्षक निवृत्ती गुरव यांनी केले, तर आभार व्यापारी संघाचे सहकार्यवाह राजा राजाध्यक्ष यांनी मानले.
