क.म.शि. प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतून साकारले विज्ञान प्रदर्शन :विविध विषयांवरील ४७ प्रतिकृती सादर..

कुडाळ : क.म.शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, कुडाळ येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यानिमिताने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विविध विषयांवरील ४७ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला पालकांनी भेट देऊन कौतुक केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सी.व्ही.रमन यांच्या प्रतिमेस प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज मॅडम यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शाळेत विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध शैक्षणिक व ज्ञानवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विज्ञानविषयक ज्ञान सादर केले.
विज्ञान दिनाचे मुख्य आकर्षण ठरले विज्ञान प्रदर्शन. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली नाविन्यपूर्ण व उपयुक्त अशी ४७ मॉडेल्स मांडली होती. यामध्ये ज्वालामुखी, सौरमंडळ, पृथ्वीचे स्तर, वातावरण, मानवी शरीर रचना, पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, रिफ्लेक्स आर्क, जैविक प्रश्नमंजुषा बोर्ड, विद्युत बचत, टाकाऊपासून टिकावू संकल्पना, कृषी क्षेत्रातील एआय, एआय रोबोट, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश होता.
तसेच वाहतूक नियंत्रण प्रणाली, नो-पार्किंग अलार्म, अपघात टाळणारी स्वयंचलित कार, होम सिक्युरिटी सिस्टम, फायर एक्स्टिंग्विशर, एअर पोल्युशन कंट्रोलर, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, स्मार्ट डस्टबिन, पाणी व्यवस्थापन प्रणाली, वायरलेस टेस्टर, बजर वायर गेम, ट्रेन टनेल प्रकल्प, आर्किमिडीज स्क्रू, हायड्रॉलिक लिफ्ट, लेझर तंत्रज्ञान, विमान प्रकल्प आदी मॉडेल्स विशेष आकर्षण ठरले.
यासोबतच वजन व्यवस्थापनासाठी काय खावे व काय प्यावे याविषयी माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली. रांगोळी प्रदर्शनात मानवी शरीराचे अवयव रेखाटण्यात आले. तसेच विज्ञान प्रदर्शनासोबत प्रश्नमंजुषा व नाटक यांचे सादरीकरणसुद्धा करण्यात आले.
या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन प्रयोगशीलता, सर्जनशीलता व संशोधनाची आवड निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन विज्ञान शिक्षिका पूजा खानोलकर व अर्चना धुरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

You cannot copy content of this page