सिंधुदुर्गनगरी, ता. २७: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७३ रिक्त लिपिक पदांसाठी उद्या, २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेच्या केंद्रांमध्ये आयबीपीएस संस्थेमार्फत मोठा बदल करण्यात आला आहे.अर्जदारांची संख्या मोठी असल्याने तसेच तांत्रिक सुविधांच्या मर्यादांमुळे ही परीक्षा आता केवळ सिंधुदुर्ग व गोवा येथे न होता प्रामुख्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील केंद्रांवर पार पडणार आहे. सुरुवातीला ही परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा परिसरातील पाच केंद्रांवर घेण्याचे नियोजन होते. मात्र, ७३ जागांसाठी जिल्हाभरातून तब्बल ५०७१ अर्ज प्राप्त झाल्याने केंद्रांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयबीपीएसच्या कडक तांत्रिक निकषांनुसार सुरक्षित सर्व्हर, बायोमेट्रिक सुविधा आणि हाय-स्पीड इंटरनेट असलेली केंद्रे आवश्यक असतात. जिल्ह्यात एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवारांची परीक्षा घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथील केंद्रांची निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र बदलामुळे काही उमेदवारांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते. मात्र, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व्हावी यासाठीच हा निर्णय घेतल्याचा खुलासा बँकेकडून करण्यात आला आहे.
उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे तसेच बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा बँकेमार्फत करण्यात आले आहे.
लिपिक भरती परीक्षेच्या केंद्रांत मोठा बदल…
