कणकवली : पुणे येथे दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस अँड वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन २०२५-२६ मध्ये कणकवली येथील एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस अँड वैदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २५०० विद्यार्थी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी कणकवली केंद्रातील एकूण १० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय फेरीसाठी निवड झाली होती.
या स्पर्धेत नंदिनी मनीष राणे हिने वैदिक मॅथ्स गटात बारावा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली, तर भौमिक संदीप अंधारी याने अबॅकस गटात तेरावा क्रमांक मिळवत केंद्राचे नाव उज्ज्वल केले.
सहा मिनिटांत १०० गणिते अचूक सोडविणे असे या स्पर्धेचे आव्हानात्मक स्वरूप होते. वेग, अचूकता आणि एकाग्रता यांची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेत कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली.
अबॅकस स्पर्धेत भाग्येश सावंत, दुर्वांक राणे, जयेश पाटील यांना ‘बेस्ट परफॉर्मर’ ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच वैदिक मॅथ्स स्पर्धेत अनय सावंत, नारायण रणशूर, गार्गी तांबे, उमैझा शेख आणि स्विझल डिसोझा यांना ‘बेस्ट परफॉर्मर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्लासच्या संचालिका सौ. पूजा राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या परिश्रमांमुळे व सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले.
अबॅकस (Abacus) आणि वैदिक गणित (Vedic Maths) या आधुनिक गणितीय पद्धती विद्यार्थ्यांच्या गणितातील वेग, अचूकता, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्यास प्रभावी ठरत आहेत. ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अबॅकस ही पायाभूत गणित कौशल्ये विकसित करण्यास उपयुक्त ठरते, तर ८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणित क्लिष्ट गणितीय समस्या व स्पर्धा परीक्षांमध्ये जलद गणना करण्यास मदत करते.
कणकवलीसारख्या तालुक्यातून राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक ठरत आहे.
एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लास, कणकवलीचे राष्ट्रीय स्पर्धेत दैदिप्यमान यश…
