⚡बांदा ता.२६-: साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने आणि पंजाबी कल्चर अँड वेलफेअर असोसिएशन यांच्या सहकार्याने ‘संत नामदेव जी’ या विषयावर आयोजित एकदिवसीय चर्चासत्र दि. २२ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे अत्यंत उत्साहात व विद्वत्तापूर्ण वातावरणात पार पडले. भारतीय संत परंपरा, संत नामदेव ह्यांचे ह्या परंपरेतील योगदान आणि वर्तमान परिस्थितीत त्याचे महत्त्व असा सखोल ऊहापोह या चर्चासत्रात करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील आणि तेथील इतर ख्यातनाम महाविद्यालयांतील संशोधक-प्राध्यापक डॉ. विनिता सिंह, डॉ. रविंदर सिंह, डॉ. रेणुका सिंह, डॉ. हरविंदर सिंह आणि पंजाबी साहित्य अकादमीचे समन्वयक डॉ. रावैल सिंह ह्यांचा समावेश होता.
मुंबईहून जे संशोधक वक्ते निमंत्रित होते, त्यामध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार विजेते ज्येष्ठ अनुवादक चंद्रकांत भोंजाळ आणि साहित्यिक, संशोधक डॉ. निर्मोही फडके ह्यांचा समावेश होता. पंजाब वेलफेअर असोसिएशनकडून कमांडर गुरुबक्ष सिंह आणि नांदेड, हिंगोली विभागाचे निवृत्त जिल्हाधिकारी डॉ. संतोख सिंह संधू (आय ए एस अधिकारी) ह्यांनी संत नामदेवांविषयी आपले विचार मांडले. संतोख सिंह ह्यांनी नांदेडमधील संत नामदेव ह्यांच्या नरसी बामणी येथील जन्मस्थानी आपल्या शासकीय कार्यकाळात आलेले अनुभव कथन केले.
दिल्लीस्थित सर्व संशोधक-वक्त्यांनी आपापले विचार प्रभावीपणे पंजाबी भाषेत मांडले. डॉ. रविंदर सिंह ह्यांनी नामदेवांच्या अभंगातील सगुण-निर्गुण भक्तीबद्दल तत्त्वज्ञानपर विवेचन केले. डॉ. रेणुका सिंह ह्यांनी ज्ञानेश्वर-नामदेव संबंधाबद्दल मानसिक विश्लेषणपर प्रश्न उपस्थित केले. डॉ. रावैल सिंह ह्यांनी घुमान आणि पंजाबमधील संत नामदेवांच्या वास्तव्याबद्दल मुद्दे मांडले. डॉ. हरविंदर सिंह ह्यांनी गुरु ग्रंथसाहिबमधील संत नामदेव-वाणीतील विशेष शब्दांबद्दल विश्लेषण केले.
त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे उपस्थित श्रोत्यांना संत नामदेवांच्या कार्याचा भाषिक दृष्टीकोनातून परिचय झाला.
या चर्चासत्रात ज्येष्ठ अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांनी संत नामदेव यांच्या अप्रकाशित हिंदी अभंगांबद्दल, मराठीतून हिंदीमध्ये अनुवाद न झालेल्या अभंगांबद्दल मुद्दे मांडले. या चर्चासत्राच्या निमित्ताने हे भाषिक आदान-प्रदान होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
साहित्य संशोधक डॉ. निर्मोही फडके यांनी ‘आजच्या परिप्रेक्ष्यात संत नामदेवांच्या काव्यातील सामाजिकता’ या विषयावर आपले विचार मांडले. संत कबीर आणि गुरु नानक सिंह यांच्याही काही शतके आधी होऊन गेलेल्या संत नामदेवांनी देशाटन करून उत्तर भारतात भारतीय भक्ती-आंदोलनाचा पाया घातल्यामुळे, उत्तर भारतीय मध्ययुगीन काव्य-साहित्य आणि समाज परंपरा संत नामदेवांच्या ऋणात असल्याचे त्यांनी सांगितले. गुरु ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट असलेले संत नामदेवांचे ६१ अभंग जे वेगवेगळ्या रागांवर आधारित आहेत, त्या संगीत-तत्त्वाचा मुद्दाही त्यांनी मांडला. डॉ. फडके यांनी डॉ. रेणुका यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे ऐतिहासिक पार्श्वभूमीचा संदर्भ देत थोडक्यात निराकरण केले. तसेच नामदेवांच्या काव्यातील सामाजिक जाणिवा, अन्यायाविरुद्धची भूमिका आणि भक्तीच्या माध्यमातून व्यक्त झालेला मानवतावाद यांचा संदर्भ देत, आजच्या काळातील सामाजिक आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांच्या अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक मांडणीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
चंद्रकांत भोंजाळ आणि डॉ. फडके यांनी आपले विवेचन हिंदीत सादर केल्यामुळे विविध भाषिक पार्श्वभूमीच्या उपस्थितांना — विशेषतः पंजाबी श्रोत्यांना — हे विषय समजून घेणे सुलभ झाले. गुरु ग्रंथसाहिबपुरतेच माहीत असलेले संत नामदेव बाबांचे महाराष्ट्रासाठी, वारकरी संप्रदायासाठी असलेले कार्य, इतिहास इ.बद्दल अधिक जाणून घेता आले, असे अनेक श्रोत्यांनी सांगितले.
डॉ. विनिता सिंह यांनी संपूर्ण सत्राचा समारोप करताना सर्व वक्त्यांच्या विवेचनाचा सारांश मांडत, संत नामदेव यांच्या अभंगांतील भाषिक सौंदर्याचा वेध घेतला.
या कार्यक्रमाला पंजाबी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभागृह पंजाबी श्रोत्यांनी भरले होते. संत साहित्याविषयी असलेली आस्था आणि नामदेवांच्या विचारांबद्दलची जिज्ञासा यामुळे संपूर्ण वातावरण अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी झाले होते.
संत नामदेवांच्या साहित्याचा व्यापक सामाजिक संदर्भात अभ्यास होणे गरजेचे आहे, त्यासाठी हे चर्चासत्र म्हणजे एक उत्तम सुरुवात असल्याने ते यशस्वी ठरले आहे, अशी भावना उपस्थितांनी या वेळी व्यक्त केली.
पंजाबी-मराठी भाषिक सेतू दृढ करणारे संत नामदेव चर्चासत्र नवी मुंबईत येथे संपन्न…
