⚡मालवण ता.२५-: सावंतवाडी येथे दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘मालवणी करंडक’ एकांकिका महोत्सवात मालवण तालुक्यातील भरड येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी सगुण पोयेकर यांचा ‘कला गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
ओंकार कला मंच व पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय नाट्यमहोत्सवात नाट्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सगुण पोयेकर यांची निवड करण्यात आल्याने मालवण तालुक्याच्या नाट्यवर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
मालवणच्या हौशी नाट्य चळवळीत खलनायकाच्या प्रभावी भूमिकांमुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सगुण पोयेकर यांनी दत्त मंदिर, राम मंदिर येथील विविध नाट्यप्रयोगांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवरील त्यांच्या दमदार अभिनयासोबतच उत्कृष्ट अभिवाचक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
स्थानिक स्तरावर नाट्यकलेची परंपरा जपण्याबरोबरच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असून त्यांच्या या योगदानाची दखल घेत यंदाचा ‘कला गौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या महोत्सवात सावंतवाडीचे सचिन धोपेश्वरकर, कुडाळचे अंकुश कुंभार, वेंगुर्ला-वडखोल येथील आनंद नार्वेकर तसेच कणकवलीचे भास्कर उर्फ भाई सामंत यांच्यासह सगुण पोयेकर यांचा सन्मान होणार आहे.
मालवणी नाट्यपरंपरेला चालना देणाऱ्या या सन्मानामुळे मालवण तालुक्याचा नाट्यअभिमान उंचावला असून विविध स्तरांतून पोयेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
