_सावंतवाडी पालिकेची पहिलीच कौन्सिल बैठक वादळी:तर शहरात खोदलेले रस्ते सुरळीत करा, अँड. नीता सावंत कविटकर यांची मागणी..
⚡सावंतवाडी ता.२५- सावंतवाडी नगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या ऑनलाइन उपस्थितीवरून चांगलाच वाद रंगला. सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्या; मात्र विरोधी शिंदे शिवसेना पक्षाचे नगरसेवक संजू परब यांनी यास तीव्र आक्षेप घेत थेट विरोध दर्शविला.
“नगराध्यक्ष रजेवर असताना त्यांनी ऑनलाईन उपस्थित राहणे योग्य नाही. दोन-दोन नगराध्यक्षांची गरज काय?” असा सवाल उपस्थित करत ऑनलाईन प्रणाली तात्काळ बंद करण्याची मागणी परब यांनी केली. भाजपचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी विरोधी पक्षाची सूचना मान्य करत ऑनलाईन प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला.
पत्रकारांशी बोलताना नगरसेवक संजू परब यांनी ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला. “या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून, सध्या संबंधित विभागात अभियंता उपलब्ध नाही. त्यामुळे या योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
बैठकीदरम्यान विरोधी पक्षनेते बाबू कुडतरकर, काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक देवेंद्र टेमकर आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात सहभाग घेतला. आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, अॅड. सायली दुभाषी, अॅड. नीता सावंत कविटकर, आनंद नेवगी आदींनी विविध विषयांवर चर्चा केली.
सावंतवाडी शहरातील रस्ते खोदाईच्या प्रश्नावर अॅड. नीता सावंत कविटकर यांनी विशेष लक्ष वेधले. एकूणच बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली; मात्र नगराध्यक्षांच्या ऑनलाईन उपस्थितीचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
