सामाजिक बांधिलकीच्या समीरा खलीलमुळे अनर्थ टळला
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील बाहेरचावाडा परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक झडप घालून त्याच्या मानेचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ल्यामुळे मुलगा जोरजोरात किंचाळू लागला.
ही परिस्थिती पाहून सामाजिक बांधिलकीचे भान राखत समीरा खलील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या कुत्र्याच्या तावडीतून मुलाला बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. हल्ल्यात मुलाच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुलाला उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे उपचारासाठी दाखल केले.
सध्या संबंधित मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याच दिवशी सकाळपासून भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे तब्बल सहा नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने दखल घेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी ठाम मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि समीरा खलील यांनी केली आहे.
या प्रसंगी समीरा खलील व रवी जाधव यांनी संबंधित मुलाच्या उपचारासाठी मोलाचे सहकार्य केले.
