⚡मालवण ता.२०-:
आजच्या युवा पिढीमध्ये वाचनाचे प्रमाण फार कमी झाले आहे. त्यामुळेच समाजात घडणाऱ्या घडामोडींबाबत युवा पिढीला फारशी माहिती नसते. युवा पिढीचा समाजाशी असणारा संवाद तुटत चालला आहे. हा संवाद पुन्हा जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना वाचनाची सवय लावावी असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कल्पना मलये यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा येथे बोलताना केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका महिला शाखा मालवण यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून कल्पना मलये या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहा काळसेकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु, जिल्हा महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, तालुका संरक्षण उपाध्यक्ष भगवान जाधव, संस्कार उपाध्यक्ष नचिकित पवार, पर्यटन सचिव सचिन कासले, संग्राम कासले, संस्कार सचिव मिलिंद पवार लक्ष्मण तळेगावकर, भानुदास तळगावकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, हिशेब तपासणी शंकर कदम, भरत पेंडूरकर, संघटक लीना तळगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा पेंडुरकर यांनी केले.
यावेळी बोलताना साहित्यिका कल्पना मलये म्हणाल्या, जीवनात आपल्याला नेहमीच संघर्ष करावा लागतो. परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, त्यागमूर्ती माता रमाई यांचा संघर्ष आपल्या संघर्षापेक्षा कित्येक पटीने मोठा आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आजच्या महिला सुखी आणि आनंददायी जीवन जगत आहेत. याची जाणीव प्रत्येक महिलांनी ठेवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मताधिकारामुळे आज महिलांचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे महिलांनी विसरून चालणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्य रुजवण्यासाठी ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे.
यावेळी लहान मुलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, त्याग मूर्ती माता रमाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. सूत्रसंचालन तृप्ती कांबळे यांनी केले.
