डिगस-सुर्वेवाडीत गवे रेड्यांचा उपद्रव…

उन्हाळी पिकांचे नुकसान:बंदोबस्त करण्याची मागणी ..

⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा रेड्यांच्या कळपाचा मुक्त संचार सुरू असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
उन्हाळी पिके गवा रेडे पायदळी तुडवत असून नाचणी, मका, वाली, कुळीथ आदी पिके फस्त केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून ते हवालदिल झाले आहेत. सायंकाळी सात वाजल्यापासून रात्रभर लोकवस्ती परिसरात गवा रेड्यांचा वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वीही अनेकदा चोरगेवाडी फाटा, खांदीचेगाळू भागात भर रस्त्यावर गवा रेड्यांचे दर्शन ग्रामस्थांना झाले आहे. गेल्या काही दिवसांत तर गवा रेड्यांचा उपद्रव या भागात वाढला आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. वनविभागाने या भागात गस्त वाढवून, गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा तसेच नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

You cannot copy content of this page