नगरसेवक प्रतीक बांदेकर: जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने कुठल्याही प्रकारे राजकारण केले जाणार नाही..
⚡सावंतवाडी ता.१७-: शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली नव्या नळपाणी योजनेच्या कामात कुठलेही राजकारण न करता जनतेच्या सुचना ऐकून चांगले काम करण्यासाठी निश्चितच पावले उचलली जातील. येणाऱ्या मे २०२७ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आणून शहरवासीयांना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा देण्यात येईल अशी ग्वाही पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी दिली. सद्यस्थितीत साडेतीन हजार नळ ग्राहक असून नवी योजना मार्गी लागल्यानंतर ५ हजार ग्रहकांच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल आहे अशी माहिती त्यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामात काही प्रमाणात त्रुटी होत्या. त्या त्रूटी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पहाणी अंती सुधारण्याच्या सुचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे या योजनेचे काम परिपुर्ण आणि जनतेच्या सुचना लक्षात घेऊन केले जाईल. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने कुठल्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नाही अशी ग्वाही श्री. बांदेकर यांनी दिली. तर सध्यस्थितीत या योजनेचे काम २० टक्केच पूर्णत्वास आले आहे. ठेकेदाराकडून घेतलेल्या माहितीनुसार मे २०२७ पर्यंत ही योजना पुर्णत्वास येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका निलम नाईक उपस्थित होत्या.
श्री. बांदेकर म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरात पाळणेकोंड धरणावर नव्याने सुरू असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेतला. आम. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून ही योजना अंमलात आणली होती. या कामास २०२३ ला मंजूरी मिळाली होती. हे काम २०२६ पर्यंत पुर्ण करायचे होते. मात्र, तांत्रिक अडचणी, परवानग्या अन्य कारणांमुळे या योजनेचे काम आताच्या स्थितीत २० टक्केच मार्गी लागले आहे. या योजनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, कोलगाव, केसरी ग्रामपंचायत आदींकडून परवानगी घेण्यासाठी आम्ही भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानुसार लवकरच परवानग्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे नळयोजनेच्या कामाला गती मिळणार असून २०२७ पर्यंत हे काम पुर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठेकेदाराकडून तसा हिरवा कंदील देखील मिळाला आहे. उभाबाजार, झिरंग, माठेवाडा आदि ठिकाणी पाणी टंचाईची समस्या अधिक प्रमाणात जाणवते त्या भागातील मुख्य पाईप लाईनचे काम जलद गतीने हाती घेण्यात आले आहे. एकुणच या कामात काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या होत्या. या प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन सोडविण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यात कोणत्याही त्रुटी होऊ नये म्हणून तज्ञ समितीची नेमणूक देखील करण्यात आली आहे. पालिकेचे निवृत्त पाणी पुरवठा अधिकारी व अन्य तज्ञांचे मार्गदर्शनही याकामी घेण्यात आले असून लवकरच ही योजना पूर्णत्वास आणून जनतेला सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच या योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते पुनश्च सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पावसाळ्यात रस्ते खचू नये यासाठी पहिल्यांदा खडीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर त्या खडीकरणावर डांबरीकरण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
