⚡बांदा ता.१६-: नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास असलेले आणि सातार्डा (तरचावाडा) येथील मूळ रहिवासी प्रशांत गजानन बागकर (वय ५०) यांचा काल सकाळी गोवा येथील कुठ्ठाळी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला.
दुचाकी आणि गोवा परिवहन मंडळाची कदंबा बस यांच्यात झालेल्या या समोरासमोर धडकेमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण सातार्डा आणि गोवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात रविवारी (ता. १५) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कुठ्ठाळी येथे घडला. प्रशांत बागकर हे आपल्या दुचाकीवरून सातार्डा येथून वास्कोच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या कदंबा बसशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रशांत बागकर हे कामाच्या निमित्ताने गोव्यात असायचे. शनिवारी सातार्डा-तरचावाडा येथील महापुरुष मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमासाठी ते आपल्या कुटुंबासह मूळ गावी आले होते. पूजा आटोपून सकाळी परत कामावर जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्यावर सातार्डा येथे मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत बागकर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे एका हसतखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फोटो:-
पासपोर्ट.
कुठ्ठाळी येथे कदंबा बस-दुचाकी भीषण अपघात; सातार्ड्याचे प्रशांत बागकर ठार…
