सिंधुदुर्गात महायुतीचा झेंडा; ५० पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय…

सिंधुदुर्गनगरी ता ९
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागा लढवल्या त्यापैकी ४१ जागा जिंकून महायुतीने निर्विवाद यश संपादन केले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अस्तित्वच संपले आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पडल्या ,७ फेब्रुवारीला मतदान व आज ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन त्यामध्ये महायुतीने लढविलेल्या एकूण जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी तब्बल ४१ जागा जिंकल्या आहेत. तर सर्व पंचायत समिती मध्येही मोठे यश प्राप्त केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांवर महायुतीची निर्विवाद सत्ता आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी ३१ जागा भाजपने लढविल्या त्यापैकी २७ जागांवर विजय प्राप्त केला आहे तर शिंदे सेनेने १९ पैकी १४ जागांवर विजय संपादन केला आहे तर ६ ठिकाणी अपक्ष उमेदवार व केवळ ३ जागांवर उद्धवसेनेने विजय मिळवला आहे. हा निकाल पाहता महाविकास आघाडीचे अस्तित्वच संपले आहे.
खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केल्याने तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे आणि राबविण्यात येणाऱ्या विकास योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवल्यानेच जिल्ह्यातील जनतेने महायुतीला निर्विवाद यश दिले आहे. त्या सर्व मतदारांचे मी जाहीर आभार मानतो. काही ठिकाणी युतीमध्ये बंडखोरी झाली त्यांना समजावूनही त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली अशांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे ते जिंकले असले तरी ते आमचेच आहेत असे मी म्हणणार नाही. असेही यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत युतीची सत्ता येईल

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक युतीच्या माध्यमातून लढविण्यात आली त्यानुसार जागावाटपही करण्यात आले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत युतीची सत्ता येईल आणि अध्यक्ष कोण? हे वरिष्ठ नेते ठरवतील.

काही जागा हरलो त्याची खंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा लढलो,महायुतीच्या उमेदवारांची निशानी घराघरात पोहोचविली आहे. मात्र काही ठिकाणी यश आले नाही त्या ठिकाणी संघटना कार्यकर्ते कमी पडले.याची खंत आहे.

You cannot copy content of this page