⚡मालवण ता.०७-:
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश कल्याणराव इंगळे हे दि. १० फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामी भक्तांची श्रद्धा व तीर्थक्षेत्र अक्कलकोट स्वामी दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या सदिच्छा भेटीसाठी येणार आहेत. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्यदिन पूजा अर्चा व मठात वार्षिक साजरे होणारे सण यांची माहिती श्री. इंगळे हे भाविकांना देणार आहेत.
यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री. महेश इंगळे यांचे आगमन होणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळ यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुका परिक्रमा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता पालखीचे मठात आगमन होणार असून सकाळी ९ ते ११ या वेळेत दर्शन व प्रसाद वाटप होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
