जे काही बोलेन ते निवडणुकीनंतर, आता केवळ विकासाच्या माध्यमातूनच बोलेन…

सुदन उर्फ सुधा कवठणकर:सातार्डा येथे ग्रामदेवतांच दर्शन घेऊन प्रचाराचा केला शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.०१-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेश अत्यंत उत्साहात केला आहे. सातार्डा येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आणि विजयाचा कौल मागत श्रीफळ वाढवून त्यांनी प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला.

यावेळी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे वातावरणात प्रचंड उत्साह दिसून आला.

​प्रचाराच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुदन कवठणकर यांनी अत्यंत संयमी पण ठाम भूमिका मांडली. आपण एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता असून जनतेशी आपली नाळ जन्मजात जोडलेली आहे, असे सांगत त्यांनी विकासाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवले. विरोधकांवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा, गेल्या अनेक वर्षांत जे बदल झाले नाहीत ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी आता जास्त बोलणार नाही, जे काही बोलेन ते निवडणुकीनंतर केवळ विकासाच्या माध्यमातूनच बोलेन,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मतदारसंघातील रस्ते, आरोग्य आणि युवकांच्या रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

​या निवडणूक रिंगणात काही बंडखोर उमेदवार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा उल्लेख करत त्यांनी मतदारांना सावध राहण्याचे आवाहन केले. धनशक्ती आणि अफवांच्या राजकारणाला आरोंदा मतदारसंघातील सुज्ञ जनता नक्कीच चपराक देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पंचायत समितीचे उमेदवार शेखर मांजरेकर यांच्यासह सातार्डा सरपंच संदीप प्रभू, कवठणी माजी सरपंच सुमन कवठणकर, संतोष गोवेकर, ज्ञानदीप राऊळ, सिद्धू केरकर, रामदास सातार्डेकर, किरण प्रभू आणि शिवसेना-भाजप युतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page