तळवडे गट विकासात पहिल्या क्रमांकावर नेणार…

संदीप गावडे:शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि सावंतवाडी टर्मिनस प्रश्नावर विशेष भर..

⚡सावंतवाडी ता.३१-: “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गटांमध्ये तळवडे गट हा विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर नेणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे,” असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. तळवडे आणि मळगाव यांसारख्या वेगाने शहरीकरण होणाऱ्या भागांसाठी आगामी काळात निधीचा ओघ वाढवून पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर त्यांनी भर दिला.

​प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना संदीप गावडे यांना जनसामान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि समस्या आहेत, त्या केवळ ऐकून न घेता त्यावर प्रत्यक्ष कृती करून त्या सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. “लोकांचे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

​गावडे यांनी सांगितले की, तळवडे आणि मळगाव ही गावे आता केवळ ग्रामीण राहिलेली नाहीत. महामार्ग आणि रेल्वे स्थानकांच्या सानिध्यामुळे या भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. वाढत्या लोकसंख्येला साजेसा विकास करण्यासाठी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

​सावंतवाडी टर्मिनसचा प्रलंबित प्रश्न हा केवळ रेल्वेचा प्रश्न नसून तो स्थानिक युवकांच्या रोजगाराशी आणि सोयींशी जोडलेला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे श्री गावडे म्हणाले.

​”केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे आणि मा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्णत्वास नेणारच,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

​जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांच्या थेट कामांना गती देणे आणि तळवडे गटाचा सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. जनतेने दिलेल्या प्रेमाचे रूपांतर मी विकासकामांत करून दाखवेन, असे सांगत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

You cannot copy content of this page