विक्रांत सावंत:समोरचा उमेदवार नेमका कोणत्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरला हे आम्हालाच समजत नाही..
⚡ सावंतवाडी, ता. ३१-:
माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात आतापर्यंत अनेक विकासकामे झालेली असल्यामुळे प्रचारासाठी घरोघरी जात असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनतेचा आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा लाभत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास माजगाव जिल्हा परिषद महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना येत्या पाच वर्षांत प्रभावीपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्व मतदारांचा आशीर्वाद आवश्यक असून, आजपर्यंत जसा सरपंच उमेदवारांना जनतेने भरभरून पाठिंबा दिला, तसाच आशीर्वाद आम्हालाही द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी विरोधी उमेदवारावर टीका करताना सांगितले की, समोरचा उमेदवार नेमका कोणत्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, हे आम्हालाच समजत नाही. त्यामुळे तो फारसा प्रभावी प्रचार करेल, असे वाटत नसल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
