उघड्या फिडर पिलरमुळे जीवितास धोका…

चार दिवसांत कारवाई नाही झाली तर महावितरणला घेराव:देव्या सुर्याजी..

⚡सावंतवाडी ता.३०-: बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेला महावितरणचा फिडर पिलर उघडा पडला असून महावितरणचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शहरात वस्तीच्या ठिकाणी असेच प्रकार दिसून येतात. त्यामुळे चार दिवसांत महावितरणने हि परिस्थिती बदलावी अन्यथा, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष , नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.

श्री. सुर्याजी म्हणाले, महावितरणच बाजारपेठेतील भागाकडे देखील लक्ष नाही. संचयनी पॅलेसच्या येथे नागरिक राहतात, लहान मुलं खेळतात. इथला फिडर पिलर उघडा असून धोकादायक झाला आहे. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती बघता जीव गेल्यानंतर महावितरण प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल त्यांनी केला. तर, एकीकडे पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर मागणी केल्यानंतर निधी उपलब्ध करून देतात. मात्र, मुजोर अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कादरी मशिद येथील स्ट्रीट लाईटचा बॉक्स देखील अनेक महीने उघडा पडला होता. इशारा दिल्यानंतर तो बदलण्यात आला.‌ त्यामुळे शहरात वस्तीच्या ठिकाणी असलेले उघडे असणारे ट्रान्स्फॉर्मर, फिडर पिलर चार दिवसांत बदलले न गेल्यास महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.‌

You cannot copy content of this page