अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने कर्तबगार नेत्याला गमावले…

प्रवीण भोसले: अजित पवार यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली..

⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला नेता गमावला आहे. महाराष्ट्राचे ‘विकास पुरुष’ म्हणून त्यांची ओळख होती, अशा शब्दांत त्यांचे एकेकाळचे सहकारी तसेच कौटुंबिक स्नेही, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत क्लेशदायक असल्याचे सांगताना भोसले म्हणाले, “अजित पवार यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. मी माझा जिवलग मित्र गमावला आहे, याचे मला अतोनात दुःख होत आहे.”
ते पुढे म्हणाले, “अजित पवार हे माझे सहकारी आणि कौटुंबिक स्नेही होते. शरद पवार आणि माझ्यामधील ते एक महत्त्वाचा दुवा होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकास प्रक्रियेत त्यांचा मोठा वाटा होता. ते अत्यंत कर्तबगार नेते होते.”
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातही अजित पवार यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करत भोसले म्हणाले, “जिल्ह्याची राजधानी उभारण्यासाठी त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. मी राजकारणात कायम सक्रिय राहावे, यासाठी त्यांनी भावाप्रमाणे मला साथ दिली.”
“अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती आणि ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. मात्र, काळाने त्यांच्यावर दुर्दैवी घाला घातला. त्यांचे निधन राज्यासाठी आणि माझ्यासाठीही अत्यंत दुःखद आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो,” अशी प्रार्थना प्रवीण भोसले यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page