Headlines

ओरोसजवळ ३०.१३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा…

⚡ओरोस, ता. ४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील तिघांविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ३ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओरोस येथील खर्येवाडी परिसरातील खालसा पंजाबी ढाब्यासमोरील गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आली. पोलिसांनी संशयावरून अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
या कारवाईत २१ लाख ६३ हजार ४५० रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ तसेच ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ वाहन असा एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गोपाळ राजाराम गवस (वय ३४, रा. दापोली-अन्नपूर्णावाडी, ता. सावंतवाडी), शिरीष सुभाष गवळी (वय ३५, रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि सिद्धेश सुभाष केसरकर (वय ३४, रा. आळेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक फौजदार सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर व ऋषिकेश टोपले यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page