सावंतवाडीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर…

साक्षी वंजारी:दोन दिवस घरात पाणी नाही, स्थानिक नगरसेवकांची प्रभागात दुर्लक्ष असल्याची नाराजी केली व्यक्त..

⚡सावंतवाडी ता.२७-: शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून घराघरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. पिण्याचे पाणी नाहीच, पण कपडे धुण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केला आहे.

ते म्हणाले, नगराध्यक्षा सध्या सुट्टीवर असताना प्रभारी नगराध्यक्षांकडे प्रत्यक्षात चार्ज देण्यात आला आहे की नाही, असा सवाल उपस्थित करत साक्षी वंजारी यांनी नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या प्रभागातील नगरसेवक फोन उचलत नसून नागरिकांच्या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.इतर प्रभागांमध्ये नियमित साफसफाई होत असताना मात्र आमच्या प्रभागात कोणतीही स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागातील अनेक समस्या गंभीर असून त्याबाबत नगरसेवकांना कोणतीही जाण नसल्याचा आरोप करत, नाव न घेता नगरसेवक सुधीर आडीवडेकर व नगरसेविका दुलारी रांगणेकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यासारखे धडाडीचे नेते सत्ताधारी नगरसेवकांकडे असताना सुद्धा स्थानिक पातळीवरील समस्या का सुटत नाहीत, असा थेट सवाल साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे.
पाण्याचा प्रश्न व प्रभागातील अन्य समस्या तातडीने न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही साक्षी वंजारी यांनी दिला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page