जि प साठी केवळ दोन अर्ज दाखल:आतापर्यंत जि प साठी ८८ तर प स साठी १३६ अर्जाची विक्री..
⚡कुडाळ ता.२०-: तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका दिसून आली. आज कुडाळ तालुक्यातुन पहिला अर्ज अपक्ष उमेदवार भानुदास सूर्यकांत रावराणे यांनी दाखल केला. डिगस गावचे रहिवासी असलेल्या भानुदास रावराणे यांनी पावशी जिल्हा परिषद मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घावनळे येथील सखाराम उर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी घावनळे जि प मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान आज देखील जि.प. साठी २८ तर पं.स. साठी ३८ जणांनी अर्ज खरेदी केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची २१ जानेवारी ही शेवटची तारीख आहे. आज २० जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदसाठी ८८ आणि पंचायत समितीसाठी १३६ असे एकूण २२४ अर्ज विक्री करण्यात आले आहेत. आज जि प साठी २८ तर प स साठी ३८ अर्ज विक्री करण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असल्याने आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. आज तहसीलदार कार्यलयात उमेदवारांची वर्दळ सुद्धा दिसत होती. त्यामुळे आज मोठ्या संख्येने नामनिर्देशन पत्र दाखल होतील अशी अपेक्षा होती.
उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कक्ष देखिल सज्ज होता. पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यामुळे आज अर्ज दाखल करून घेण्यासाठी प्रशासन देखील सज्ज होते. पण आज दुपारी ३ वाजेपर्यंत केवळ दोघांची नामनिर्देशन पत्र दाखल झाली. त्यामध्ये अपक्ष उमेदवार भानुदास सूर्यकांत रावराणे या डिगस गावच्या उमेदवारांने पावशी जिल्हा परिषद मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर घावनळे जि प मतदार संघातून ठाकरे सेनेचे सखाराम उर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी अर्ज दाखल केला.
अनेक उमेदवारांनी आज अर्ज भरण्यापेक्षा अर्ज तपासून घेणे पसंत केले. काहींना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांनी अर्ज दाखल केला नाही. बऱ्याच उमेदवारांनी स्वतःसाठी दोन अर्ज खरेदी केले. एक पक्षाकडून आणि पक्षाने एबी फॉर्म मिळाला नाहीतर अपक्ष असे दोन उमेदवारी खरेदी केले आहेत. पक्षांचे जागा वाटप फॉर्म्युले ठरल्यामुळे अनेक इच्छूकांचा पक्षाने पत्ता कट केला आहे. त्यांच्यामध्ये असलेली नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यातूनच दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष निवडणूक लढविण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येत आहे. म्हणूनच आज उमेदवारी अर्ज भरून तयार असला तरी बहुतांशी उमेदवारांनी अर्ज दाखल न करण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.
दरम्यान उद्या 21 जानेवारी हा शेवटचा दिवस असल्याने उद्या अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवरांची झुंबड उडणार आहे.
