नामनिर्देशन पत्र भरताना जास्तीत जास्त चार व्यक्तींनाच प्रवेश…

वाहन संख्येवर सुद्धा निर्बंध:सहा. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले निर्देश..

⚡कुडाळ ता.१५-: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. दि. १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जाणार आहेत. त्यासाठी कुडाळचे तहसिदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे सर्वानी पालन करावे असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवार आणि सूचक यांची संख्या निशिचीत करण्यात आली आहे. तसेच वाहन संख्येवर सुद्धा निर्बंध असणार आहेत.
प्रसिद्धी पत्रकत म्हटले आहे, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुक विभाग व कुडाळ पंचायत समिती निर्वाचक गणामधील निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार दिनांक १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार) ते दि.२१ जानेवारी २०२६ (बुधवार) या कालावधीत सकाळी ११ वा. पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत (रविवार दि. १८/०१/२०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.) उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे “तहसिलदार कार्यालय कुडाळ, तहसिलदार यांचे दालन” तळ मजला, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे स्विकारली जाणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशनपत्रे भरतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी, जि.प.पं.स. सार्वत्रिक निवडणूक २०२६ यांचे कार्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवणेत येणार आहे. नामनिर्देशन पत्रक दाखल करणाऱ्या इच्छूक उमेदवार किंवा त्यांच्या सोबतच्या व्यक्तीच्या वाहनाची संख्या जास्तीस जास्त २ एवढी निश्चित करण्यात येत आहे. नामनिर्देशन पत्र भरतेवेळी उमेदवार व सूचक यांचे सोबत जास्तीत-जास्त २ व्यक्ती (एकुण ४) व्यक्तींना निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी देणेत येत आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार) ते दि.२१ जानेवारी २०२६ (बुधवार) या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत १०० मीटरच्या परिसरात कुठलीही खाजगी आस्थापना सुरु ठेवू नयेत. नागरीकांनी/अभ्यागतांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे १०० मीटर मधील शासकीय व खाजगी कार्यालयातील कामे अत्यावश्यक नसल्यास वरील दिवशी व वेळेत शक्यतो टाळावीत. अभ्यागतांचे संबंधित कार्यालयाकडे काम जर अत्यावश्यक असेल तर पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्रामध्ये स्वतःकडील वाहन पार्क करून संबंधित कार्यालयाकडे पायी यावे.
निवडणूक सारखी संवेदनशील बाब असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी अनावश्यक नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सदरची बाब करणेत आलेली आहे. जेणेकरुन प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची देखील कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.
वैदयकीय आपत्कालीन सेवा व इतर आपत्कालीन सेवेतील वाहनांना याबाबत मुभा देणेत आलेली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली वाहने पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पाकींग क्षेत्रात पार्क करुन रुग्णालयात जाण्याचे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय व परिसर सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत घेण्यात आलेला असून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार व नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page