⚡मालवण ता.१४-:
वायरी भूतनाथ गावच्या किनारपट्टीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिल्यावर याबाबत वायरी ग्रामपंचायतीने दखल घेत किनाऱ्यावर फलक लावून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
वायरी भूतनाथ येथील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, बाटल्या, टाकावू अन्नपदार्थ टाकण्यात येत होते. यामुळे किनारपट्टीचे सौंदर्य बिघडून परिसरात अस्वच्छता पसरली होती. याबाबत जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी ग्रामपंचायतीचे लक्ष वेधत कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने किनारपट्टीवरील कचरा उचलून साफसफाई केली आहे. तसेच याठिकाणी ग्रामपंचायतीकडून सुचनेचा फलक लावण्यात आला आहे. त्यानुसार सदर परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली असून कचरा टाकल्यास कचरा टाकणाऱ्यावर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर कचरा करणाऱ्या व्यक्ती निदर्शनास आणून देणाऱ्याला २०० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सरपंच भगवान लुडबे यांनी दिली आहे.
