निराधार महिलेला ‘जीवन आनंद’ची मायेची सावली…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पुढाकाराने मिळाला सुरक्षित निवारा..

⚡सावंतवाडी ता.१२-:
सावंतवाडी शहरात गेल्या ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या उडपी येथील एका दांपत्यावर नियतीने घाला घातला. मागील वर्षी श्रीमती परवीन अझरुद्दीन शेख (वय ५५) यांच्या पतीचे आजाराने निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या पूर्णतः निराधार झाल्या. उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करून त्या जीवन जगत होत्या; मात्र कालांतराने त्या स्वतः आजारी पडल्या. आजारपणामुळे काम मिळेना, परिणामी राहत्या खोलीचे भाडे थकले आणि नाईलाजाने त्यांना खोली खाली करावी लागली. त्यानंतर अक्षरशः रस्त्यावरच त्यांचे जीवन सुरू झाले.

सुमारे एक महिना रस्त्यावर काढल्यानंतर त्या एका दुकानाच्या बाजूला झोपत असल्याचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दिली. त्यानंतर संस्थेचे सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, हेलन निबरे व समीरा खलील घटनास्थळी दाखल झाले. चौकशीदरम्यान श्रीमती शेख भावुक होऊन रडू लागल्या. त्यांना तीव्र ताप असल्याचे लक्षात येताच रूपा मुद्राळे व हेलन निबरे यांनी त्यांना धीर देत सावरले.

कोणाचाही आधार नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुढील निर्णय घेतला. नगरसेवक देव्या सूर्याजी, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू तसेच सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या ज्योती दूदवाडकर यांच्या सहकार्याने श्रीमती शेख यांना अणाव (पंदूर) येथील ‘जीवन आनंद’ आश्रमात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मायेची व सुरक्षिततेची सावली मिळाली.

आश्रमात जाताना श्रीमती शेख यांनी व्यक्त केलेले शब्द अनेकांच्या मनाला चटका लावणारे होते — “तुमचे मी खूप आभारी आहे. मला विसरू नका, पुन्हा एकदा तरी भेटायला या.” ही हाक जणू आपल्याच कुणाची असल्याचा भास उपस्थितांना झाला.या घटनेतून समाजात ज्यांना कोणाचाही आधार नसतो त्यांच्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने आधारस्तंभ ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. याप्रसंगी संस्थापक संदीप परब उपस्थित होते.

You cannot copy content of this page