नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन केली पाहणी; तातडीने उपाययोजना व कारवाईचे आदेश, परिसरातील रस्ता-गटार-स्ट्रीट लाईट समस्यांवरही लक्ष..
⚡सावंतवाडी ता.११-:
सावंतवाडी शहरातील चिवारटेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका इमारतीचे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडले जात असल्याने गेल्या आठ दिवसांपासून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास शहरात येणाऱ्या पर्यटकांसह शहराबाहेरील गावांमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या प्रकाराबाबत नागरिकांनी नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तत्काळ शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते सागर गावडे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान संबंधित इमारतीचे सांडपाणी पाईपद्वारे आंबोलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गटारात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. मात्र या मार्गावरील गटार बंदिस्त झाल्याने उष्टे-खरकटे गाळ तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे.
या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिक व पर्यटकांच्या आरोग्यास धोका संभवत असल्याने नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी तात्काळ आरोग्य विभागाचे निरीक्षक विनोद सावंत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. संबंधित सांडपाण्याबाबत तातडीने उपाययोजना करावी तसेच संबंधित इमारतीच्या प्रमुखांना आपल्या जागेतच सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना देण्याचे आदेश त्यांनी दिले. अन्यथा संबंधित घरमालकावर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारे रस्त्यावरील गटारात सांडपाणी सोडल्याबाबत तक्रारी आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी श्री उपरलकर देवस्थान ते लाडाचीबाग, चिवारटेकडी या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या मार्गावरील वाढलेली झाडी तोडणे, गटार खोदाई करणे, रस्त्याची साईट पट्टी मातीने भरणे, तसेच काही ठिकाणी अपूर्ण राहिलेले स्ट्रीट लाईट लवकरात लवकर बसवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. श्री उपरलकर देवस्थानपासून पुढील वळणावर रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याने त्यावरही उपाययोजना करण्याबाबत त्यांनी लक्ष वेधले.
याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या साईट पट्टीला उभारलेले पत्र्याचे रेलिंग वाढलेल्या झाडी-झुडपात झाकले गेल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, याबाबतही तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
या पाहणीवेळी उमेश सावंत, संतोष परब उपस्थित होते. या भागातील नागरिकांनी आपल्या समस्या थेट मांडाव्यात, त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी दिले.
