कणकवलीत २४ जानेवारी रोजी ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ चे आयोजन…

१ हजार मुलांना ५० रुपयांचे मोफत कुपन ; ऑर्केस्ट्रा, फनी गेम्स व मनोरंजनाची रेलचेल..

⚡कणकवली ता.०९-: दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी ‘खाऊ गल्ली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे होणार आहे. या कार्यक्रमात एक हजार लहान मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे कुपन दिले जाणार आहेत.

या खाऊ गल्लीचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटन प्रसंगी लहान मुलांना चॉकलेट वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमस्थळी स्थानिक नागरिकांना फूड स्टॉल्स लावण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

यावेळी लहान मुलांसाठी फनी गेम्स, जादूगारांचे मनोरंजन, टॅटू काढण्यासाठी गोव्यातील दोन कलाकार, तसेच दोन आकर्षक सेल्फी पॉईंट्स असणार आहेत. मुलांसोबत आलेल्या पालकांसाठी मराठी व हिंदी गाण्यांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा देखील आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कणकवलीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष तथा मंडळाचे अध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

यावेळी भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजू गवाणकर, राजा पाटकर, नवराज झेमणे, जावेद शेख, बाळा सावंत, राज नलावडे आदी उपस्थित होते.

समीर नलावडे म्हणाले, कणकवलीतील नागरिकांनी माझ्या राजकीय जीवनात मला कायम साथ दिली आहे. या नगरपंचायत निवडणुकीत मला ५ हजार ९६ मते मिळाली, तर माझ्या पत्नीला सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी केले. ज्यांनी मतदान केले नसेल, तीही माझीच माणसे आहेत. त्यामुळे पदावर नसलो तरी कणकवलीकरांशी माझी बांधिलकी कायम आहे. पालक व मुलांची अपेक्षा लक्षात घेऊन यंदाही खाऊगल्ली आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यक्रमाला कणकवली शहरातील पालक व लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

बॉक्स :
एक दिवस बच्चे कंपनीसाठी!

लहान मुलांनी आपल्या पालकांसोबत येऊन खाऊ गल्लीचा आनंद घ्यावा, मौजमजा करावी, हीच या उपक्रमामागची भूमिका आहे. मित्रमंडळींच्या सहकार्याने ‘एक दिवस बच्चे कंपनीसाठी’ या संकल्पनेतून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो, असे समीर नलावडे यांनी सांगितले.

राजकीय भूमिकेवर स्पष्टीकरण

खा. नारायण राणे हाच माझा पक्ष आहे. त्यांना व मंत्री नितेश राणे यांना सोडून मी कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली. स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page