मालवण बाजारपेठेत रात्रीची कचरा गाडी अखेर सुरू..
⚡मालवण ता.०८-:
मालवण शहराचा वाढता विस्तार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठ परिसरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश आले आहे. मालवण नगरपालिकेकडून आता रात्रीच्या वेळी बाजारपेठेत कचरा गाडी सुरू करण्यात आली असून, यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
मालवण हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. येथील विलोभनीय समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी दरमहा लाखो पर्यटक मालवणला भेट देत असतात. विशेषतः मालवण मच्छी मार्केट आणि बंदर जेटी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असते.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सौरभ ताम्हणकर यांनी १५ जानेवारी २०२४ रोजी मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी नमूद केले होते की, केवळ सकाळी स्वच्छता मोहीम राबवून ही समस्या सुटणार नाही. जोपर्यंत कचरा टाकणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही आणि त्यांना कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही, तोवर स्वच्छतेचा हेतू साध्य होणार नाही. त्यांनी पत्रात खालील प्रमुख मागण्या केल्या होत्या, रात्री १० नंतर बाजारपेठेत कचरा गाडी फिरवण्यात यावी; कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत; वारंवार घाण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
सौरभ ताम्हणकर यांच्या या मागणीची आणि निवेदनाची दखल घेत मालवण नगरपालिकेने अखेर रात्रीच्या वेळी कचरा संकलन करणारी गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आता रात्री १० वाजेनंतर बाजारपेठेत फिरणार असून, व्यापारी आणि हॉटेल चालक आपला कचरा थेट या गाडीत देऊ शकणार आहेत. यामुळे रस्त्यावर कचरा फेकला जाण्याचे प्रमाण कमी होणार असून मच्छी मार्केट परिसरातील दुर्गंधीपासून नागरिकांना सुटका मिळणार आहे.
“केवळ स्वच्छता मोहिमा राबवून उपयोग नाही, तर त्यामागे ठोस नियोजन असणे आवश्यक आहे,” असे मत सौरभ ताम्हणकर यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आणि पाठपुराव्यामुळे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने मालवणमधील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मालवणला कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे तसेच मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर व भारतीय जणता पार्टी गटनेत्या चारुशीला आचरेकर यांचे सौरभ ताम्हणकर यांनी मनापासून आभार व्येक्त केले आहे व महायुतीचे मनोमिलन लवकर व्हावे आणि या सरकारकडून कामांचा असाच धडाका पाहायला मिळावा, अशी अपेक्षा आहे कारण असे निर्णय मालवणचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होणार असून, पर्यटकांनाही स्वच्छ आणि सुंदर मालवणचा अनुभव घेता येईल अशी अपेक्षा सौरभ ताम्हणकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्येक्त केले आहे
