कलमठला स्वच्छ पाण्याचा दिलासा….

नगराध्यक्ष संदेश पारकर सक्रिय: दूषित पाणीपुरवठा थांबवण्याचे आश्वासन:ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी घेतली नगराध्यक्ष संदेशजी पारकर यांची भेट..

⚡कणकवली ता.०६-: कलमठ गावात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अस्वच्छ व दूषित पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नाने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले आहे. मागील वर्षी कलमठ ग्रामपंचायत नळयोजनेतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्टपणे उघड झाले होते. आशिये रोडजवळील ग्रामपंचायत नळयोजनेच्या परिसरात ड्रेनेजचे पाणी थेट आजूबाजूच्या लोकवस्तीतून सोडले जात असून, ही बाब ग्रामपंचायतच्या निदर्शनास वारंवार आणून दिल्यानंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
नगरपंचायतच्या नियोजनावर अवलंबून न राहता कलमठ ग्रामपंचायत स्तरावरच प्रभावी उपाययोजना होणे अपेक्षित होते, मात्र तसे प्रत्यक्षात घडलेले दिसून आले नाही. या अस्वच्छ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

दिनांक ५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी पुन्हा एकदा स्वतः नळयोजनेच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मागील वर्षी अस्वच्छ पाणीपुरवठ्यामुळे नगरपंचायत नळयोजनेचे पाणी वापरण्याची वेळ आली, मात्र तरीही ग्रामपंचायतला मुबलक व स्वच्छ पाणी मिळाले नाही. उलट ग्रामपंचायतला नगरपंचायतला मोठी आर्थिक रक्कम अदा करावी लागत असून, त्याचा थेट आर्थिक तसेच आरोग्यविषयक फटका नागरिकांवर बसत आहे.

या दीर्घकाळ प्रलंबित व गंभीर प्रश्नासंदर्भात नवनिर्वाचित कणकवली नगराध्यक्ष मा.श्री. संदेशजी पारकर व त्यांच्या नगरसेवकांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. यावेळी कणकवली नगरपंचायतीकडून होणारा अस्वच्छ पाणीपुरवठा तात्काळ थांबवावा आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी ठाम विनंती ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष मा. श्री. संदेश पारकर यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेत गेले अनेक वर्षे रखडलेले हे काम आता लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

यासंदर्भात बोलताना ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी कलमठ ग्रामस्थांना सांगितले की, “हा प्रश्न राजकीय नसून सामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि आरोग्याचा आहे. ही समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी नळयोजना सध्याच्या धोकादायक ठिकाणाहून तात्काळ काढून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करणे हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय आहे. आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या त्याचे गंभीर परिणाम आपल्या कुटुंबांना भोगावे लागतील. त्यामुळे स्वच्छ पाणी – सुरक्षित आरोग्य या मूलभूत हक्कासाठी कलमठ ग्रामस्थांनी एकत्र येऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page