निरवडेच्या वासुदेव वैजची ‘वैभववाडी श्री’ किताबावर मोहोर; सिंधुदुर्गातून कौतुकाचा वर्षाव…

⚡​सावंतवाडी, ता. ०५-:
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने, वैभववाडी येथील यंग स्टार मित्र मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंसाठी भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत निरवडे येथील वासुदेव वैज याने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर ‘वैभववाडी श्री’ या किताबावर आपले नाव कोरत स्पर्धेचा मुख्य मानकरी ठरला.
​ही स्पर्धा नुकतीच वैभववाडी बाजारपेठ येथील नगरपंचायत कार्यालयासमोर असलेल्या भव्य मैदानावर पार पडली. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शरीरसौष्ठव प्रेमी, प्रशिक्षक आणि क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘वैभववाडी श्री’ ठरलेल्या वासुदेव वैज याला ३० हजार रुपये रोख, आकर्षक ट्रॉफी, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, मात्र वासुदेवने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निरवडे गावातील एका उमद्या खेळाडूने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने निरवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून वासुदेव वैज याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page