तरुणांनो तुम्ही कुटुंबियांचे भवितव्य आहात…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे वेंगुर्ला येथे प्रतिपादन..

⚡वेंगुर्ला ता.०५-: गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते अपघातात 68 जीव आपण गमावले असून यामध्ये 45 मध्यमवर्गीय दुचाकीस्वार आहेत, ही बाब चिंताजनक आहे. तरुण युवक हे कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही महत्वाची असून वाहनावर मोबाईलचा वापर न करता हेल्मेट, सीटबेल्ट यांचा वापर करा. रस्ता सुरक्षा वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करा व आपले जीवन सुखकर बनवा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी आज सोमवारी (5 जानेवारी) वेंगुर्ला
कॅम्प बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग पोलीस व वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत व पोलीस स्थापना दिनानिमित्त व पोलीस रेझिंग डे सप्ताहनिमित्त आज वेंगुर्ला शहरात बाईक रॅली द्वारे शहरातून रस्ता सुरक्षा संदेश देत रॅली काढण्यात आली. सर्वप्रथम जिल्ह्यातून निघालेली बाईक रॅली वेंगुर्ला पोस्ट ऑफिस स्टॉप, शिरोडा नाका ते वेंगुर्ला कॅम्प बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र पर्यंत सांगता झाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अन्य मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी श्री. दहिकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, जिल्हा उपप्रादेशिक अधिकारी विजय काळे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, स्थानिक गुन्हा अनवेशण शाखा पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार राजन गवस, वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पीएसआय श्री. कांबळे,पोलीस हवालदार प्रथमेश पालकर, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, पोलीस अंमलदार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. दहिकर पुढे बोलताना म्हणाले, आज सुरक्षितता महत्वाची आहे. भारतात दर 5 मिनिटाला एक रस्ताबळी जातोय. बाईक रॅली चा उद्देश आहे की, जनतेत – तरुणांना रस्ता सुरक्षेचे महत्व अवगत व्हावे हा आहे. अपघात घडल्यास अपघातातील व्यक्तीला मदत करण्यासाठी तातडीने पुढे या.पहिल्या एक तासातील तुमची धावपळ दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो. 112 ची सुविधा परिपूर्ण असून ” मृत्युंजय दूत ” म्हणून पुढे या. आज पोलीस व अन्य यंत्रणा परिपूर्ण आहेत. त्यासाठी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. खेबूडकर बोलताना म्हणाले, आजची जिल्ह्यातील बाईक संदेश रॅली अत्यंत यशस्वी झाली. एसपी मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पोलीस दलाचे आदर्श काम सुरु आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास सर्वात प्रथम प्रथमोपचार घेण्यासाठी धाव घ्या. यंत्रणाचे संपर्क क्रमांक नेहमी उपलब्ध ठेवा. प्रवास करीत असताना आपल्या सोबत दुसऱ्याचीही काळजी घ्या. वाहतुकीचे नियम पाळून आपले भविष्य व कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले ठेवा. नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

विजय काळे म्हणाले, आज दोन तृतीयांश अपघात हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे हेल्मेट वापरून दैनंदिन सवय अंगवळणी पाडा. मोबाईल ही जगाशी जोडणारी खिडकी असून वाहन चालवीताना मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळा. सिंधुदुर्गमधील रस्ते रचना पाहता वाहने मर्यादेपेक्षा वेगात पळवू नका. रस्ते अपघाताची सर्वात मोठी शिक्षा त्यांच्या कुटुंबियांना होते. गंभीर अपघातयामुळे 18 ते 35 वयोगटातील व्यक्तीवर अवलंबुन असणारी कुटुंबे उघड्यावर येतात. मोबाईल व अमली पदार्थांचा वापर न करता वाहने चालवा. हेल्मेट, सीटबेल्ट वापरा व रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा. तेच सुरक्षित जीवनाची हमी देते व हाच आजच्या बाईक रॅलीचा संदेश आहे.

सर्वप्रथम पोलिसपाटील भगिनी यांनी समूहगीत सादर करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पोलीस अंमलदार प्रथमेश पालकर, पोलीसपाटील मधुसूदन मेस्त्री, होमगार्ड तेजस्विनी धुरी इत्यादीचा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रम दरम्यान आरिफा मुल्ला यांनी रस्ते सुरक्षा विषयक शपथ दिली. तर महाराष्ट्र पोलीस बँड पथक सिंधुदुर्ग द्वारे राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाकोरे पोलीसपाटील श्रीराम प्रभूराळकर यांनी व स्वागत व आभार पीआय निसर्ग ओतारी यांनी मानले. या कार्यक्रमांस वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, पं. स. अधिकारी, कर्मचारी, तहसील कार्यालय अधिकारी, अन्य शासकीय अधिकारी, पोलिसपाटील, पोलीस अंमलदार, वाहतूक पोलीस, होमगार्ड, कॅम्प आयटीआय निदेशक श्री. डिसिल्व्हा, अन्य, आयटीआय चे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page