संजय गवस:आठ दिवसांत दुसरा हप्ता जमा न झाल्यास आक्रमक आंदोलन छेडण्याचा दिला इशारा..
⚡दोडामार्ग ता.०१-:
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना दुसरा ७५ हजार रुपयांचा हप्ता वेळेत न मिळाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठराविक टप्प्यापेक्षा अधिक काम पूर्ण करूनही निधी न मिळाल्याने अनेक ठिकाणी घरबांधणी ठप्प झाली आहे.
पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडून घरकाम पूर्ण करण्याचा तगादा असताना शासनाकडून निधी वेळेवर न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडून निधीअभावी विलंब होत असल्याचे कारण दिले जात असून, हप्ता कधी मिळणार याबाबत ठोस माहिती नाही.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संजय गवस यांनी आठ दिवसांत दुसरा हप्ता जमा न झाल्यास आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
