झरेबांबर–उसप रस्त्यावरील खड्डे बुजविणार..
दोडामार्ग ;
झरेबांबर–उसप रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग सौ. विनिता विष्णू घाडी यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पंचायत समिती दोडामार्ग प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.
पंचायत समितीच्या बांधकाम विभागानुसार, अरे–शेळपी–बाबरवाडी (ग्रामा. ७१) हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असून सततच्या वाहतुकीमुळे पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या नवीनीकरणासाठी आराखडा तयार करून सर्वोच्च प्राधान्याने मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच काम सुरू करण्यात येणार आहे.
तोपर्यंत उद्या तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच पिकुळे तिठा ते उसप हा जिल्हा मार्ग असून त्यावर ग्रामसडक योजनेअंतर्गत काम प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
