राजापूर येथील २१ वर्षीय युवकाचा झाला मृत्यू..
कणकवली : कणकवली हुंबरठ येथे दुचाकी व ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अमान गनी खतीब ( वय २१ ) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०:३० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
अमान खतीब हा सावंतवाडी येथून राजापूरच्या दिशेने जात होता. यावेळी हुंबरठ येथे यु टर्न घेत असताना दुचाकीने मागून धडक दिली, असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. अमान खतीब हा राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा सुपुत्र आहे.
अपघातात अमान खतीब याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर काही प्रमाणात रक्त स्त्राव देखील झाला होता. तातडीने अमान याला १०८ नंबर च्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत अमान कडून उपचारांना कोणत्याही प्रकारची साथ मिळत नव्हती. अखेर त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अमान याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
पोलिसांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली व ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. घटनेची माहिती समजतात अमान खतीब याच्या मित्रांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णालयात धाव घेतली होती. तसेच राजापूर शहरातील अनेक व्यापारी व अमान याच्या मित्र परिवाराने कणकवलीकडे धाव घेतली.
अधिक माहिती अशी की, अमान खतीब हा बुधवारी सकाळी कामानिमित्त आपली दुचाकी घेवून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीयेथून राजापूरकडे परतत असताना त्याची कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने त्याचा मृत्यु झाला.
अमान याच्या अपघाती मृत्युमुळे खतीब कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होता.
